Maratha Aarakshan: शिंदे गटानंतर अजिदादांनाही मोठा धक्का बसणार? मराठा आरक्षणासाठी आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑक्टोबर ।। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होत असतानाच आता अजित पवार गटाचे आमदारांनी राजीनामा देण्याबाबत विधान केलं आहे.

खासदार पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पदाचा राजीनामा देत असल्याचे कळवलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. माझ्या तालुक्यातील समाज बांधव आणि मराठा समाजाच्या संघटना जसं सांगतील तसा निर्णय मी घेणार आहे, असं विधान आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे.

अतुल बेनके यांच्या विधानानंतर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाला (Maratha Aarakshan) आपला पाठिंबा दर्शवला आहे. राज्याचं राजकारण मराठा समाजाच्या हातामध्ये होतं. केंद्रामध्ये देखील मराठा समाजाचे अनेक मंत्री होते. परंतू आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी भूमिका घेतली नाही. त्यामुळे मराठा समाजाकडून होणारी राजीनाम्याची मागणी ही योग्य आहे, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

मराठा समाजाची भावना लक्षात घेता आमच्यातील काही नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जरी असा प्रसंग आला, तरी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, यापूर्वी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केलं होतं. त्यावेळी सुद्धा आम्ही आग्रभागी होतो. माझ्यावर त्या कालखंडामध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. मी आज जामीनावर आहे, मला हायकोर्टाने काही बंधने घातली आहेत. मी ती बंधने तोडली, तर मला परत जेलमध्ये जावं लागेल, असंही मोहिते पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी खासदारांनी संसदेत, तर आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा. परंतु केवळ लोकांचे समाधान व्हावं, तसं बोलून राजीनामा देण्याची भाषा करावी आणि भुमिका वेगळी घ्यावी हे पटत नाही असं म्हणत आमदारकी आणि खासदारपदाचा राजीनामा देणाऱ्या नेत्यांना संधीसाधुची उपमा देत दिलीप मोहि तेपाटीलांनी निशाना साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *