व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जानेवारी ।। मुंबई – व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर खोटा संदेश पाठवणाऱ्याविरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शस्त्रधारी व्यक्तींना अणुशक्ती नगर परिसरात पकडण्यात आल्याचा खोटा संदेश आरोपीने समाजमाध्यमांवर पसरवला होता. त्यामुळे ट्रॉम्बे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी स्वतः गुन्हा दाखल केला आहे.

अणुशक्ती नगर परिसरात पोलिसांनी शस्त्रे असलेली गाडी पकडली असून चिताकॅम्प परिसरात काही घटना घडणार असल्याचा संदेश ट्रॉम्बे परिसरातील एका क्रिकेट सीसी ग्रुपवर एका व्यक्तीने पाठवला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत पोलिसांना दूरध्वनी आले असता त्यांनी तपासणी केली. त्यावेळी ही माहिती खोटी असून एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एका व्यक्तीने पाठवल्याचे छायाचित्र पोलिसांना प्राप्त झाले. तसेच इन्स्टाग्रामवरही अशा प्रकारचे संदेश निदर्शनास आले. त्यामुळे असे संदेश पाठवून अफवा पसरवल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अशी काळजी घ्या
समाजमाध्यमांवर येणाऱ्या संदेशांची पडताळणी केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेऊ नये.
प्रक्षोभक, अफवा पसरवणारे संदेश समाजमाध्यमांवर पाठवू नये.
असे प्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *