पुणेकरांना हुडहुडी भरली, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद, पुढील दोन दिवस कसं असेल वातावरण?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जानेवारी ।। पुण्यात आठवडाभर मुक्काम ठोकलेल्या थंडीने बुधवारी पुणेकरांना हुडहुडी भरवली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी तापमानात आणखी घट झाली आणि शिवाजीनगर येथे ९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवेली परिसरात ८.७ अंश सेल्सिअस आणि १०.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुण्यात बुधवारी या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले.


मध्यरात्री थंडीचा कडाका
भव्य उपकरणांचा सेल – २६ जानेवारीपर्यंत सर्वाधिक विक्री होणाऱ्या उपकरणांवर ५५% पर्यंत सूट

शहरात गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळनंतर हवेत गारवा आणि मध्यरात्री कडाक्याची थंडी जाणवते आहे. किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअसमध्ये रेंगाळल्याने रात्री थंडी आणि सकाळी आठ वाजेपर्यंत हवेत गारठा कायम आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीपासूनच हवेतील गारठा वाढला होता. बोचऱ्या वाऱ्यांमुळे मध्यरात्री थंडी वाढली.

नागरिकांना हुडहुडी
सकाळी लवकर फिरायला, व्यायामाला गेलेल्या नागरिकांना नेहमीपेक्षा जास्त थंडी असल्याने हुडहुडी भरली. शाळेत निघालेली मुले स्वेटर, मफलर अशी जय्यत तयारी करून बाहेर पडली होती. मध्यवर्ती पुण्याच्या तुलनेत उपनगरात थंडीचा कडाका जास्त जाणवला. जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी किमान तापमान बारा अंशापेक्षा कमीच नोंदवले गेले.

गारठा कायम
सकाळी दहा वाजेपर्यंत हवेतील गारठा कायम होता. दुपारी नंतर ऊन होते; पण हवेतील गारवा कायम होता. दिवसभरात २९.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यातील नीचांकी तापमान नऊ अंश सेल्सिअस नाशिकमध्ये नोंदवण्यात आले.

दोन दिवस गारठा कायम
उत्तरेकडे वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागात सध्या गारठा वाढला आहे. हवामानातील अनुकूल बदलांमुळे पुण्यातील तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र आणि गारठा कायम राहील, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.

पाच दिवसांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

बुधवार ९.७

मंगळवार ११.४

सोमवार १२.१

रविवार १२.८

शनिवार १३.४

प्रमुख शहरांतील किमान तापमान

शहर किमान तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे ९.७

नाशिक ९.०

जळगाव ९.९

वाशिम १०.२

छत्रपती संभाजीनगर १०.४

बुलढाणा ११.०

महाबळेश्वर ११.४

कोल्हापूर १४.२

नागपूर १४.६

सोलापूर १५.४

मुंबई १८.५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *