Vinod Kambli : हृदय पिळवटून टाकणारा विनोद कांबळीचा व्हिडीओ व्हायरल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२७ डिसेंबर ।। निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (५२) याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. आता विनोदचा एक ताजा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेकांचे हृदय पिळवटून टाकणारा असा आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा, गोलंदाजांची धुलाई करत धावांचा पाऊस पाडणारा विनोद रुग्णालयात दोन जणांचा आधार घेऊन हळू हळू चालत आहे. त्याच्या कंबरेजवळ लघवीची पिशवी दिसत आहे. आधीच्या तुलनेत विनोद आता अशक्त दिसत आहे.

आजारी विनोद कांबळीला मागच्या आठवड्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केले त्यावेळी विनोदच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. त्याला स्वतःच्या पायांवर उभे राहणे आणि चालणे कठीण झाले होते. पायात पेटके येण्याचा त्रास त्याला वारंवार जाणवत होता. लघवीच्या तपासणीतून त्याला इन्फेक्शन झाल्याची बाब समोर आली होती. वारंवार उलट्या होणे, चक्कर येणे असा त्रास त्याला सतत जाणवत होता. सध्या विनोद कांबळी ठाण्याच्या आकृती रुग्णालयात उपचार घेत आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनने विनोद कांबळीच्या उपचारांसाठी तातडीने पाच लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. डॉ. विवेक द्विवेदी यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथक विनोद कांबळीवर उपचार करत आहे. रक्ताच्या गुठळ्यांमुळे विनोदला विस्मरणाची समस्या जाणवू लागली आहे. औषधोपचाराने ही समस्या कमी होण्यास मदत होईल. पण ही समस्या पूर्णपणे दूर होणार नाही. रुग्णालयातून घरी गेल्यानंतरही पुढील काही काळ विनोदला सतत मदतनिसाची गरज भासेल. विनोद औषधांना कसा प्रतिसाद देतो यावर रुग्णालयातून त्याला कधी घरी पाठवणार याचा निर्णय अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *