महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ सप्टेंबर ।। मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई- पुण्यासह मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.
आजपासून राज्यात सुरु असलेल्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह, मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
सध्या मध्यप्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. यामुळे दक्षिण गुजरातपासून वायव्य बिहारपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
आज कुठे पाऊस होणार?
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर जिल्ह्यांला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही अधून मधून पावसाच्या सरी कोसळू शकतात असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून उघडीप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची कामे करता येणार आहेत.