Amit Shah: अमित शहांकडून स्पष्ट संकेत, भाजप आमदार धास्तावले ; राज्यात ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ सप्टेंबर ।। लोकसभेला महायुतीला राज्यात सपाटून मार खावा लागला. भारतीय जनता पक्ष २३ वरुन थेट ९ जागांवर घसरला. अनेक विद्यमान खासदारांना भाजपनं संधी दिली होती. त्यातील केवळ दोन खासदारच विजयी होऊ शकले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नुकसान टाळण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहांनी विधानसभेला ‘गुजरात पॅटर्न’ लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदारांची धाकधूक वाढली आहे.

२०२२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं १८२ पैकी १५६ जागा जिंकत नैत्रदीपक विजय साकारला. त्याआधी २०१७ मध्ये भाजपला ९९ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या ९९ पैकी ५८ जागांवर भाजपनं उमेदवार बदलले. नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे विद्यमान आमदारांबद्दल असलेली मतदारांची नाराजी दूर सारण्यात भाजपला यश आलं. गुजरातमध्ये सुपरहिट ठरलेला पॅटर्न महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे.

राज्यात भाजपचे १०३ आमदार आहेत. नागपुरमधील भाजपच्या बैठकीत अमित शहांनी त्यांचा अनुभव सांगितला. ‘मी जेव्हा ३५ वर्षांचा होतो, तेव्हा पक्षानं माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे माझ्या घरी आले होते. पक्षानं माझं तिकीट कापलं. मी दु:खी आहे, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा ठाकरेंनी मला तू पक्षाचा प्रचार करु नकोस. दु:खी मनानं माणूस कोणतंही चांगलं काम करु शकत नाही, असं सांगितलं. तुझ्याकडे कोणी समजवायला येणार नाही. कारण ज्याला घरी जाऊन समजवावं लागतं, तो कार्यकर्ताच नाही असं मी मानतो, असं ठाकरे मला सांगून गेले,’ असा किस्सा शहांनी सांगितला.
अमित शहा महाराष्ट्रात, मशालीचा भाजपला धक्का; बाजारबुणगा म्हणत उद्धव ठाकरे कडाडले

एकेकाळी माझं तिकीट कापलं गेलं होतं. आज नाईलाजास्तव मला तिकिटं कापावी लागत आहेत, असं शहा नागपुरातील बैठकीत म्हणाले. तेव्हा अनेक आमदारांच्या पोटात गोळा आला. तिकीट कापलं जाईल याची तयारी ठेवा आणि तिकीट कापल्यानंतर तुम्हाला घरी कोणी समजवायलादेखील येणार नाही, हे दोन महत्त्वाचे संदेश शहांनी आमदारांना दिले. २०२२ मध्ये गुजरातमध्ये भाजप नेतृत्त्वानं ५८ आमदारांना नारळ दिला होता. तिथे भाजपचे ९९ आमदार होते. महाराष्ट्रात भाजप आमदारांची संख्या १०३ आहे. म्हणजेच ५० ते ६० आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे आमदारांची अस्वस्थता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *