महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ सप्टेंबर ।। पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. दिवट्या आमदार म्हणत शरद पवारांनी निशाणा साधला होता. यावर सुनील टिंगरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुनील टिंगरेंचे प्रत्युत्तर
शरद पवारांच्या टीकेला सुनील टिंगरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साहेब आमचं दैवत आहेत. साहेब माझ्यावरती बोलले, पण मी त्यांच्यावर बोलण्या इतपत मोठा नाही. साहेब आमचे आदरणीय आहेत आणि आदरणीय राहतील. माझा कान पकडण्याचा तेवढा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या वक्तव्यावर ती मी उत्तर देणं एवढा मी मोठा झालो नाही, असं ते म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीकडून निवडून आलेला आणि सोडून गेलेला आमदार स्वतःला दमदार आमदार म्हणवतो. कल्याणीनगर नगरमध्ये अपघातात स्कूटर वरील दोघांचा मृत्यू झाला. त्या आरोपींना मदतीसाठी हा दिवट्या आमदार तिथे उपस्थित होता. हा कसला दमदार आमदार ? असं म्हणत शरद पवारांनी टीका केली होती. वडगाव शेरी येथील सभेत ते बोलत होते.
इतर विषयांवर भाष्य
मुलगी लाडकी आहे. तिला मदत देता चांगली गोष्ट आहे. पण आज गरज कशाची आहे? मुलींची सुरक्षितता महत्वाची आहे. बदलापूर मध्ये काय घडलं. आमच्या आया बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी या सरकारला टाळता येणार नाही. आम्ही ती खात्री देतो. येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला जागा दाखवा. असं आवाहन करतो, असं शरद पवार म्हणाले.
पाऊस आल्यामुळे पंतप्रधानांनी पुण्याचा दौरा रद्द केला. त्यामुळे आपली सभा होणार का याची शंका होती. पण इथले लोक म्हणाले पाऊस येवो अथवा न येवो सभा होणार. आज प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित आहात याचा आनंद आहे, असं पवार म्हणाले.
महाराष्ट्रात आपण 48 पैकी 31 जागा जिंकल्या. लोकसभेला पंतप्रधान मोदी सांगत होते की अबकी बार 400 पार. देशाची घटना बदलायची आहे त्यासाठी 400 पार पाहिजे असं त्यांचे नेते अनेक सांगत होते. इंडिया आघाडीने तुम्हा लोकांच्या मदतीने 400 पारचा प्रयत्न हाणून पाडला, असं देखील पवार म्हणाले
यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अनेक कारखाने महाराष्ट्रात आणले आणि औद्योगिक विकास साधला. मी मुख्यमंत्री असताना पुण्यात हिंजवडी मध्ये आय टी पार्क उभारला. आता त्यातून हजारो कोटींची निर्यात होते, असं ते म्हणाले.
पंडित नेहरू देशाच्या स्वातंत्र्यासाठी 12 वर्षे तुरुंगात राहिले. त्यांच्यावर मोदी टीका करतात. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे केले आणि या देशाची ताकद जगाला दाखवून दिली आणि मोदी म्हणतात त्यांनी काय केलं. राजीव गांधींनी हा देश जागतिक शक्तिशाली देश बनवला. एका घरात नेहरूंनी तुरुंगवास भोगला, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यांनी देशाला इतकं मोठं योगदान दिलं आणि मोदी म्हणतात त्यांनी देशासाठी काय केलं? असं म्हणत पवारांनी टीका केली.