महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १५ जानेवारी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६चा अंतिम निर्णयाचा दिवस आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज पार पडलेल्या मतदानानंतर उद्या, शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची अधिकृत माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. संपूर्ण शहराचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही मतमोजणी महापालिका हद्दीतील निश्चित केलेल्या ८ केंद्रांवर पार पडणार असून प्रशासनाकडून कडेकोट नियोजन करण्यात आलं आहे.
मतमोजणी प्रक्रियेत फक्त निवडणूक विभागाने ओळखपत्र दिलेल्या अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक नियंत्रण, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, तसेच प्रसारमाध्यमांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. निकाल जाहीर करताना अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार असून कोणतीही गडबड होऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे.
शहरातील विविध प्रभागांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. निगडी येथील हेडगेवार भवन, चिंचवडमधील ऑटो क्लस्टर, भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय, अंकुशराव लांडगे नाट्यगृह परिसर, चिखली टाऊनहॉल, थेरगाव येथील कामगार भवन आणि कासारवाडी भाजी मंडई अशा ८ ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. काही प्रभागांमध्ये २० पेक्षा जास्त फेऱ्यांत मतमोजणी होणार असल्याने निकालासाठी काही तास लागण्याची शक्यता आहे.
एकूणच, पिंपरी-चिंचवडच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार? भाजप आपलं वर्चस्व टिकवणार की समीकरणं बदलणार? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उद्याच्या मतमोजणीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं असून, निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता फक्त एकच प्रश्न — उद्याच्या दहाला नेमकं काय चित्र समोर येणार?
