ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ फेब्रुवारी ।। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मुंबईत पार पडलेल्या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील हा सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल सराफांनी यावेळी सरकार आणि रसिकांचे आभार मानले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावेळी सुरेश वाडकरांना प्रदान करण्यात आला.

कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा सर्वोच्च पुरस्कार देऊन अशोक सराफांचा गौरवण्यात आले आहे. 25 लाख रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन अभिनयातून घडवलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अशोक सराफ यांचे कौतुक
अष्टपैलू, ऑल राऊंडर हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची भूक अजूनही कायम आहे असा हा मराठी मातीतला अस्सल हिरा. म्हणूनच अशोक सराफजी मराठी मातीला, मराठी माणसाला तुमचा सार्थ अभिमान आहे. अशोक सराफ वयाचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तरी साजरी करत असताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. अशोक सराफ यांचे आडनाव जरी सराफ असले तरी त्यांची काही दागिण्यांची पेढी नव्हती मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर सोने, चांदी, हिरे, मोत्यांची अक्षरशः उधळण केली अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचे कौतुक केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
अशोक मामा 75 वर्षाचे झालेत मात्र वाटत नाही. अशा या त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात हा सर्वौच्च पुरस्कार मिळतोय. मराठी चित्रपटाचा चेहरा अशोक मामा सराफ आहेत. सर्वच क्षेत्रात त्यांनी अधिकार राज्य गाजवलं. आम्ही तुमचे चित्रपट पाहात मोठे झालो त्यामुळे तुम्हाला. पुरस्कार देताना आनंद होतोय अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *