Gold Limit at Home: घरात मर्यादेशीवाय जास्त सोने असेल सावध व्हा… आयकर विभाग का करेल जप्त, जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ मार्च । गेली अनेक दशकांपासून भारतीयांमध्ये सोन्याबाबत विशेष महत्त्व राहिले आहे आणि आजही लग्नाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे महत्त्व आणखी वाढते. घरातील मुली आणि सुनांसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने तयार केले जातात, अशा परिस्थितीत प्रत्येक घरात सोने असणे एक सामान्य गोष्ट आहे. तथापि, लिमिटपेक्षा जास्त सोने घरात असेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

घरात लगीन घाई असो किंवा दिवाळी, धनत्रयोदशी सारख्या सणासुदीनिमित्त जुन्या परंपरेनुसार सोने खरेदी करायला पसंत करतात. तर सध्या जगभरात सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड बॉण्ड यांसारखे गुंतवणुकीचे पर्याय असूनही खऱ्याखुऱ्या सोन्याचे लोकांमध्ये आकर्षण अधिक आहे. आयकर विभागाकडून अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जातात ज्यात कित्येक किलो सोनं जप्त केल्याचे कानावर पडते. अशा परिस्थितीत, एका व्यक्ती किंवा कुटुंबाला घरात किती तोळं सोनं ठेवण्याची मुभा आहे?, असा प्रश्न उपस्थित होतो.

घरात किती तोळं सोनं ठेवायचं?
भारतीय लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी सोन्याचे महत्त्व लक्षात घेऊन आयकर विभागाने काही नियम केले आहेत. आयकर नियमांनुसार भारतीय लोकांना एका मर्यादेपर्यंत घरात सोने ठेवता येते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने याबाबत १९९४ मध्ये सोने (दागिने किंवा नाणी) घरी ठेवण्याबाबत निर्देश जाहीर केले होते यानुसार…

विवाहित महिलेकडे ५०० ग्रॅम सोने असू शकते.
अविवाहित महिलेकडे २५० ग्रॅम सोने असू शकते.
विवाहित किंवा अविवाहित पुरुषाकडे १०० ग्रॅम सोने असू शकते.

तर तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल तर तुम्हाला स्रोताविषयी माहिती उघड करावी लागेल, अन्यथा आयकर विभाग दंडात्मक कारवाई करू शकते. याशिवाय जर एखाद्याने घोषित किंवा कृषी उत्पन्नातून सोने खरेदी केले असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तसेच छोटी-छोटी बचत करून म्हणजे घर खर्चातून सेव्ह करून सोने खरेदी केले असेल तरीही टॅक्स भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे वारसा हक्काने मिळालेल्या सोन्यावर कोणताही कर लागू नाही मात्र, वारसाच्या बाबतीत सोने कोठून आले याबाबत माहिती देणे अनिवार्य आहे.

नाहीतर अडचणीत सापडल
लक्षात घ्या की केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा हा नियम सोने ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार देत नाही. तर आयकर छाप्यांदरम्यान सोन्याच्या जप्तीपासून करदात्याचे संरक्षण करण्यासाठी नियम लागू करण्यात आले असून हे नियम फक्त कुटुंबातील सदस्यांना लागू होतात. तर घराबाहेरील कोणत्याही सदस्याकडे सोने आढळल्यास आयकर विभाग जप्तीची कारवाई करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *