Pune News : पुण्यात वर्षाच्या सुरूवातीलाच RTO अॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। वाहनविक्रेत्यांनी दुचाकी विक्रीच्या वेळी ग्राहकाला दोन हेल्मेट देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. पण, अनेक वाहनविक्रेत्यांकडून आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) सर्व वाहनविक्रेत्यांना दुचाकीसोबत दोन हेल्मेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

शहरात अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये दुचाकीचालकांचे प्रमाण जास्त आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या बहुतांश दुचाकीचालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे। नसल्याचे दिसून आले आहे. दुचाकी खरेदी केल्यानंतर संबंधित ग्राहकाला दोन हेल्मेट देण्याबाबत मोटार वाहन कायद्यामध्ये तरतूद करण्यात आले आहे. वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कारवाई करण्याचीही तरतूद त्यात आहे. तसेच, राज्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दुचाकीसोबत दोन हेल्मेट देण्याबाबत वाहनविक्रेत्यांना सूचना दिल्या होत्या. तरीही या आदेशाची काही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे.

‘ट्रेड सर्टिफिकेट’ काही दिवसांसाठी रद्द होणार
वाहनविक्रेत्याने दुचाकी खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. वाहनविक्रेत्यांना हेल्मेटसाठी जास्तीची रक्कम देखील आकारता येणार नाही. अशा पद्धतीने हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्याचे ‘ट्रेड सर्टिफिकेट’ काही दिवसांसाठी रद्दची कारवाई केली जाणार आहे. तसेच, नागरिकांनीही दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट मागून घ्यावीत, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

66 वाहन विक्रेत्यांना दुचाकीसोबत दोन हेल्मेट देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, नागरिकांनी दुचाकीसोबत दोन हेल्मेट मागून घ्यावीत. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असं पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितलं.

राज्य परिवहन विभागाने खबरदारी घेत यापूर्वीच दुचाकी उत्पादक आणि विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, याबाबत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. पुणे आरटीओ कार्यालयानेही याबाबत पत्र काढले असून सर्व वाहन विक्रेत्यांना दुचाकीसोबत दोन हेल्मेट खरेदीदाराला देण्याचे आदेश दिले आहेत. विक्रेत्यांनी हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे पुणे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *