महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे. सामन्याचा दुसरा दिवस (4 जानेवारी) अतिशय रोमांचक होता आणि एकूण 15 विकेट पडल्या आणि 300 हून अधिक धावा झाल्या. एकूणच दुसरा दिवस गोलंदाजांच्या नावावर होता आणि फलंदाज संघर्ष करताना दिसले. तरीही भारत या सामन्यात पुढे दिसत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून 141 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे चार धावांची आघाडी होती. म्हणजे एकूणच आघाडी 145 धावांची झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रवींद्र जडेजा आठ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली होती. राहुलला (13 धावा) आणि यशस्वीला (22 धावा) बोलंडने आऊट केले. शुभमन गिल 13 धावा करून वेबस्टारच्या चेंडूवर आऊट झाला. विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळताना स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्याला सहा धावा करता आल्या. बोलंडने पुन्हा एकदा कोहलीची शिकार केली. पंतने 33 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 61 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी नितीश रेड्डी सलग तिसऱ्या डावात अपयशी ठरला. त्याला चार धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बोलंडने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत, तर कमिन्स आणि वेबस्टरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
त्याआधी ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या दिवसाही खराब सुरुवात झाली. जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनला अवघ्या 15 धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच धक्का दिला. यानंतर दिवसाच्या नवव्या षटकात मोहम्मद सिराजने सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनाही बाद करून ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. 39 धावांवर चार विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर होता.
यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथने पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या ब्यू वेबस्टरसोबत पाचव्या विकेटसाठी 57 दिवसांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाची धुरा आपल्या हाती घेतली. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना खेळत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाने स्मिथला 33 धावांवर आऊट करून भारताला मोठे यश मिळवून दिले. यानंतर ॲलेक्स कॅरीने 21 धावा केल्या आणि वेबस्टरसोबत 41 धावांची आणखी एक महत्त्वाची भागीदारी केली.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी
दुसऱ्या सत्रात केवळ एकच षटक टाकल्यानंतर बुमराह मैदानाबाहेर गेला होता, मात्र असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चार विकेट केवळ 44 धावांत गमावल्या. भारताकडून सिराज आणि कृष्णाने प्रत्येकी तीन तर बुमराह आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.