![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मार्च २०२६ ।। Pune शहर व जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव Rajesh Agrawal यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
बैठकीत अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट असलेल्या सरकारी व खासगी रुग्णालयांसोबतच विद्यार्थ्यांच्या सरकारी वसतिगृहांनाही घरगुती गॅसचा पुरवठा प्राधान्याने करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांनी गॅसटंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, Jitendra Dudi यांनी सांगितले की, पुणे शहर आणि जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सर्व एलपीजी वितरकांकडून नागरिकांना नियमानुसार सिलिंडरचे वितरण सुरू आहे. कोणीही सिलिंडरची जादा दराने विक्री करत असल्यास नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी. अशा वितरकांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अलीकडे काही भागांमध्ये गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र तेल कंपन्या आणि स्थानिक वितरकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील गोदामांमध्ये पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवांसह विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्याच्या सूचनाही वितरकांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांपासून दूर राहून संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 🔥🏠
