IND vs ENG – जेम्स अँडरसनने इतिहास रचला, 700 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने इतिहास रचला आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमधील 700 विकेटचा टप्पा ओलांडला. धर्मशाळा कसोटीमध्ये तिसऱ्या दिवशी कुलदीप यादव याची विकेट घेताच अँडरसनने हा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणारा अँडरसन पहिला वेगवान गोलंदाज आहे.

अँडरसनच्या पुढे आता ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न (708 विकेट्स) आणि श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (800 विकेट्स) आहेत. या यादीत हिंदुस्थानचा अनिल कुंबळे 619 विकेट्ससह चौथ्या, इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 604 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

हिंदुस्थानविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्याआधी जेम्स अँडरसनच्या नावावर 690 विकेट्स होत्या. त्यामुळे तो याच मालिकेत 700 विकेटचा माइलस्टोन गाठणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. हैदराबाद कसोटीमध्ये संधी न मिळाल्या अँडरसनने विशाखापट्टणम कसोटीत मात्र 5 विकेट घेतल्या.

त्यानंतर राजकोट कसोटीत त्याला फक्त 1 विकेट मिळाली. रांची कसोटीतही त्याला फक्त 2 विकेटवर समाधान मानावे लागले होते. मात्र धर्मशाळा कसोटीत त्याने पहिल्या डावात शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांना बाद करत 700 विकेटचा टप्पा गाठला.

जेम्स अँडरसन याने 2003मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध लॉर्डस मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता. आतापर्यंत त्याने 187 कसोटी सामने खेळले आहेत. अँडरसनच्या पुढे फक्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 200 कसोटीत हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले. दरम्यान, कसोटीसह 194 वन डे लढतीही अँडरसनने खेळल्या असून यात त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. तर 19 आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीमध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *