रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या पारड्यात ? नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मार्च ।। : लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) घोषणा झाली. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली जाणार आहे. परंतु, अजूनही महायुतीतील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव काही घेत नाही. काही जागांवरुन महायुतीच्या घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. अखेर या जागेचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. हा मतदारसंघ भाजपच्या (BJP) पारड्यात पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपच्या पारड्यात पडली असून या जागेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आजच नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी निलेश राणेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नारायण राणे मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणे कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राणे-सामंतांचा मतदार संघावर दावा, पण अखेर जागा भाजपच्याच पारड्यात
रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेनं लढली आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेनं जागा लढावी,अशी माझी इच्छा आहे. पण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. एकंदरीत सामंतांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा सांगितला होता. तर, नारायण राणेंनीही रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार, असा दावा केला होता. पण, आता समोर आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात पडली असून आता शिंदेंच्या हातून अमरावतीपाठोपाठ आणखी एक जागा जाणार असं दिसतंय.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गची ही जागा शिवसेना-भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला यायची. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते, असं उदय सामंतांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी नारायण राणे आणि किरण सामंत यांची भेट झाल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर आता या जागेवरुन नारायण राणे लढवणार असल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *