Hardik Pandya News : नाव पुकारले हार्दिकचं ; प्रेक्षकांमधून रोहित…रोहितच्या घोषणा; संजय मांजरेकर खवळले!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ एप्रिल । मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya)आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हे दोघे नाणेफेकीसाठी मैदानात आले असता, वानखेडेवरील प्रेक्षकांनी रोहित शर्माच्या नावाचा जयघोष सुरू केला. हार्दिकला अशा प्रकारे चिडवणं समालोचक आणि दिग्गज क्रिकेटपटू संजय मांजरेकरांना सहन झालं नाही. ते प्रेक्षकांवर खवळले. हार्दिकला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना त्यांनी मैदानातूनच गोड सल्ला दिला.


हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स या होन संघांमध्ये मुंबईतील वानखेडेवर सामना रंगला. या सामन्यात मुंबईच्या संघाला पराभूत व्हावं लागलं. हा या मोसमातील तिसरा पराभव होता. तत्पूर्वी आधीचे दोन सामने गमावलेला आणि प्रेक्षकांच्या ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या हार्दिकला वानखेडेवरही वाईट अनुभव आला. नाणेफेकीसाठी मैदानात हार्दिक आणि संजू सॅमसन हे दोघे आले होते. समालोचक मांजरेकर यांनी हार्दिकचं नाव पुकारलं. त्यावर प्रेक्षकांमधून रोहित शर्माच्या नावानं घोषणाबाजी सुरू झाली.

समालोचक मांजरेकर यावरून चिडले. हार्दिकला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना त्यांनी तिथंच सल्ला – वजा इशारा देऊन टाकला. कृपया नीट वर्तन असू द्या, असं मांजरेकर म्हणाले. रोहित शर्माच्या नावाच्या घोषणा सुरू असताना, हार्दिकच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली.

हार्दिकवर इतका राग का?
आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल झाला. हार्दिक पंड्या गुजरातचा संघ सोडून मुंबईच्या तंबूत परतला. इतकंच नाही तर, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याकडे जबाबदारी दिली. हीच बाब मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खटकली. त्यांनी हार्दिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांदरम्यान हार्दिकला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा असायला हवा होता, असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरही हार्दिकला ट्रोल केले जात आहे. आता प्रेक्षकांचा रोष, सलग तीन पराभव यातून सावरून हार्दिक पंड्या कसं कमबॅक करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *