ST Bus News: प्रवाशांचा एसटी प्रवास या निर्णयामुळे सुखकर होणार ? ; वाचा संपूर्ण बातमी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ एप्रिल ।। उन्हाळी सुट्टीत गावी जाणा-या प्रवाशांच्या समस्या ,तक्रारींचे निवारण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी मित्र ही अभिनव संकल्पना राबविली आहे. मुंबईसह राज्यातील काही प्रमुख थांब्यावर प्रवासी मित्रांची नेमणूक होणार आहे.

१५ एप्रिल ते १५ जून दरम्यान सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यत विभागीय कार्यालय व विभागीय कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक व प्रशासकीय कर्मचा-यांची नियुक्ती प्रवासी मित्र म्हणून करण्यात येणार आहे.

राज्यात दररोज सुमारे १२ हजार ६०० एसटी रस्त्यावर धावतात.त्यातून सरासरी ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. यातून दिवसाला एसटीला २०ते ३० कोटी रुपये (प्रतिपूर्ती रक्कमेसह) उत्पन्न मिळते. १५ एप्रिल पासून उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे.

एसटीच्या प्रवासाला नागरिक प्राधान्य देतात. परंतु ब-याचदा चालक / वाहक बसमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी असतानाही मार्गातील नियोजीत थांब्यावर थांबत नाहीत .सर्वीस रोडने जाऊन प्रवासी चढ -उतार न करता उडडाण पुलावरुन बस नेतात. तसेच प्रवाशांना नियोजित ठिकाणी न उतरवता उडडाण पुलाच्या मागे – पुढे उतरण्यास भाग पाडतात.

राज्यातील एसटीच्या प्रत्येक विभागात / तालुक्यात किमान २ ते ३ थांबे आहेत, जेथे चालक -वाहक थांब्यांवर प्रवासी चढ उतार न करता परस्पर बस मार्गस्थ करतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन महामंडळाचे आर्थिक नुकसान होते.

याबाबत महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.त्याची गंभीर दखल महामंडळाने घेतली आहे. उन्हाळी गर्दीचे हंगामात प्रवासी गर्दीत होणारी वाढ लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय होऊ नये व उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता महामंडळ प्रवासी मित्र ही योजना राबवित आहे.

येथे चुकविला जातो थांबा
मार्ग———-महत्वाचे थांबे

बोरीवली – सायन मार्गे पुणे/कोकण————गोरेगाव, जोगेश्वरी, विलेपार्ले

बोरीवली – ठाणे ————कासार वडवली, पातली पाडा, मानपाडा, माणकुली

मुंबई – पनवेल————मानखुर्द, जुईनगर, कोकणभुवन (सीबीडी बेलापूर), कामोठे

सातारा – कोल्हापूर————काशीळ, उंब्रज, पेठनाका, वाठार

औरंगाबाद – धुळे————हातनूर

नाशिक – धुळे/जळगाव————पिंपळगाव, ओझर

मुंबई-महाड————रामवाडी, वडखळ, इंदापूर

कारंजालाड – मेहेकर———— मालेगाव, कनेरगाव

अकोला – अमरावती————बोरगाव मंजू

यवतमाळ – नागपूर————केळझर, सेलू, देवळी (सर्व थांबे वर्धा विभाग)

नागपूर – भंडारा———— बोरगाव

प्रवासी मित्र कोण
सर्व विभाग नियंत्रक यांनी विभागीय कार्यालय व विभागीय कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक व प्रशासकीय कर्मचारी (सर्व शाखांमधील लिपीक, वरिष्ठ लिपीक लेखाकार इत्यादी) व आगार व्यवस्थापक यांनी त्यांचे आगारातील पर्यवेक्षकीय कर्मचारी / प्रशासकीय कर्मचारी (लिपीक, वरिष्ठ लिपीक, लेखाकार, वाहतूक नियंत्रक इ.) यांची प्रवासी मित्र म्हणून निवड.

संध्याकाळी ७ नंतर काय
महामंडळाची प्रवासी मित्र ही योजना चांगली असली तर थांब्यावर संध्याकाळी सात वाजेपर्यतच कर्मचारी कार्यरत असणार आहेत. रात्री ७ ते ११ या वेळेत मोठ्या संख्येने प्रवासी लांब पल्याच्या एसटीने प्रवास करतात.

या वेळेत खरे तर प्रवाशांच्या मदतीला एसटीचे कर्मचारी असणे आवश्यक आहे. कारण या वेळेत गाड्या वाहतुक कोंडीत अडकल्याने त्या नेमक्या कधी थांब्यावर येणार याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. परिणामी महामंडळाने संध्याकाळी ७ नंतर कर्मचा-यांची नेमणूक करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *