राज्यात या ठिकाणी वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ एप्रिल ।। मुंबई आणि कोकणात पुढील 48 तासांमध्ये उकाडा आणखी तीव्र होणार असून, उष्णतेची लाट काही अडचणी निर्माण करताना दिसणार आहे. शहरातील काही भागांमध्ये सूर्याचा प्रकोप अंगाची काहिली करताना दिसेल, तर कोकण किनारपट्टी भागात मूळ तापमानाहून अधिक दाह जाणवेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तिथं विदर्भ आणि मराठवाड्यावर मात्र गारपीट आणि अवकाळी पावसाचं सावट कायम असून, काही क्षेत्रांमध्ये पावसाचं वादळी रुप पाहायला मिळणार आहे.

अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ येथे गारपीट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळं हवामान विभागानं इथं नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन केलं आहे.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. शेगाव खामगाव बुलढाणा तालुक्यासह आजूबाजूच्या परिसराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोपडून काढलं. पिकं उध्वस्त झाली तर, घर संसार उघड्यावर पडले. अनेक ठिकाणी अजूनही खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. गारपीट अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं या भागात मोठं नुकसान झाल्यामुळं बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकही हवालदिल झाले.

हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *