मोबाईलच्या अति वापरामुळे विकार बळावले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ एप्रिल ।। अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांनंतर मोबाईल हीसुद्धा आता मानवाची जीवनावश्यक गरज बनली आहे. मात्र तासन्तास मोबाईलचा वापर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक ठरत असून यामुळे मान, पाठ व हाडांशी संबंधित विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण अस्थिरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

वातावरणातील किंवा खाण्यातील बदलामुळे सामान्यपणे आजार म्हटले तर सर्दी, ताप, खोकला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र आता मोबाईलच्या वापरातूनही आजार होत असल्याचे समोर आले आहे. किशोरवयीन मुले ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये सध्या स्मार्टफोन दिसत आहेत. कोरोना काळापासून मोबाईलचा वापर अधिक वाढला आहे. मात्र तासन्तास मोबाईलचा वापर करणे धोकादायक असल्याचे समोर आले आहे. स्मार्टफोनच्या वापरातून मानेचे विकार असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून टेक्स्ट नेक सिंड्रोम या नवीन आजाराने त्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

मानेच्या स्नायूच्या नैसर्गिक रचनेवर ताण
ठाण्यातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कृष्णमूर्ती म्हणाले, मोबाईलचा वापर करताना आपण नेहमी मोबाईल डोळ्याच्या सरळ रेषेत धरत नाही. आपल्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे नेहमी मान खाली वाकून मोबाईल पाहतो. रिल्स, चित्रपट, मालिकाही मोबाईलवर पाहतो. सतत मान खाली राहिल्याने मानेच्या स्नायूच्या नैसर्गिक रचनेवर ताण येतो. मान दुखू लागते. यातूनच टेक्स्ट सिंड्रोम होतो. मोबाईल वापरताना तो डोळ्याच्या सरळ रेषेत ठेवूनच पाहावा. तासन्तास मोबाईल वापरत असाल तर मध्ये वीस ते तीस मिनिटांचा ब्रेक घ्यावा. मोबाईलचा जास्त वापर केल्याने झोप खराब होऊन मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निरीक्षणही तज्ज्ञांनी नोंदवले आहे. हा अतिवापर स्मरणशक्तीवर परिणाम करू शकतो. स्पष्टपणे विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *