डास ठराविक व्यक्तींनाच जास्त चावण्यामागे हे आहे विज्ञान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । पावसाळ्यातले अनेक आजार डास चावल्यामुळे होतात. आता नव्याने केरळमध्ये आढळलेल्या झिका व्हायरसचा संसर्गही डासांमार्फतच (Mosquito) होतो. डास चावू नयेत म्हणून पुरेपूर काळजी घेऊनही हे आजार पसरण्याचं प्रमाण खूप कमी होत नाही.

अनेक जण असं सांगताना तुम्ही ऐकलं असेल, की डास त्यांनाच जास्त चावतात. हफ पोस्टने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार डास हे सिलेक्टिव्ह इन्सेक्ट्स (Selective Insects) आहेत. म्हणजेच कोणाला चावायचं याची निवड ते करतात आणि त्यामुळे काही ठरावीक व्यक्तींना इतरांच्या तुलनेत डास जास्त वेळा चावत असल्याचा अनुभव येतो. हे काही घटकांवर अवलंबून असतं.

‘जर्नल ऑफ मेडिकल एंटॉमॉलॉजी’ने (Journal of Entomology) केलेल्या नियंत्रित अभ्यासानंतर काही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. ए रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना डास चावण्याची वारंवारिता जवळपास दुप्पट असते. माणसाच्या शरीरातल्या स्रावांमुळे डास एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे आकर्षित होतात.

फ्लोरिडा विद्यापीठातले कीटकशास्त्राचे प्राध्यापक जोनाथन एफ. डे यांनी सांगितलं, की ठरावीक रक्तगटाच्या (Blood Group) व्यक्तींच्या चावण्याला डास प्राधान्य देतात, यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे; मात्र शरीरातून वैशिष्ट्यपूर्ण संकेत मिळत असल्यामुळे डास विशिष्ट व्यक्तींच्या शरीरावर येऊन चावतात, या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला.

‘विशिष्ट संकेतांमुळे (Cues) डासांना रक्ताच्या स्रोताची माहिती मिळते. त्यात सीओटू अर्थात कार्बन डायॉक्साइड (CO2) सर्वांत महत्त्वाचा आहे. जनुकीय घटकांसह अन्य अनेक घटकांवर माणसातल्या शरीरातलं सीओटूचं उत्सर्जन अवलंबून असतं. सीओटू जास्त उत्सर्जित करणाऱ्या व्यक्तींकडे डासांसह बहुपाद कीटक आकर्षित होतात,’ असं त्यांनी सांगितलं.

पण मग असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की वाहनांसारख्या कार्बन डायॉक्साइड उत्सर्जित करणाऱ्या निर्जीव वस्तूंकडे डास का आकृष्ट होत नाहीत? तर, त्यांना प्राथमिक संकेतांबरोबर दुय्यम संकेतही मिळावे लागतात. उदाहरणार्थ, मानवी शरीरातून लॅक्टिक अॅसिडही बाहेर पडत असतं. त्याचा गंध त्यांना मिळतो आणि लक्ष्य त्यांच्या लक्षात येतं, असं डे म्हणतात.

‘डासांची दृष्टीही चांगली असते. आजूबाजूच्या वातावरणात ठळकपणे काय उठून दिसतं आहे, हे त्यांना कळतं. त्यामुळे डार्क रंगाचे कपडे घातले असतील, तर अशा व्यक्तीकडे डास जास्त आकर्षित होतात,’ असंही डे यांनी सांगितलं.

शरीराचं तापमान हाही महत्त्वाचा घटक असतो. प्रत्येकाच्या शरीराचं तापमान वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं; पण त्यातल्या त्यात अधिक उष्ण तापमान असलेल्या व्यक्तींच्या शरीरावर डास बसण्याची शक्यता जास्त असते. त्वचेच्या जवळ रक्त मिळेल, अशा ठिकाणी डास बसतात.

क्लीव्हलँड क्लिनिकमधल्या त्वचारोगतज्ज्ञ मेलिसा पिलियांग म्हणतात, की शरीराचं तापमान (Body Temperature) जास्त असेल, व्यायाम जास्त केला जात असेल, फिरणं जास्त असेल, जास्त प्रमाणात मद्यप्राशन केलं जात असेल, अशा व्यक्तींकडे डास जास्त प्रमाणात आकर्षित होतात. तसंच, गर्भवती महिला आणि लठ्ठ व्यक्तींमध्ये मेटाबोलिक रेट जास्त असल्याने त्यांच्याकडेही डास आकृष्ट होण्याचं प्रमाण जास्त असतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *