निसर्गाची लीला अगाध ! दर 15 मिनिटांनी चालू-बंद होतो अमेरिकेतला ‘हा’ झरा!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । निसर्गाच्या काही चमत्कारांमागचं (Natural Wonders) रहस्य आपल्याला कधीच कळत नाही. अर्थात, निसर्गाचे ते चमत्कार पाहणं हा एक खासा अनुभव असतो. असाच एक अनुभव मिळतो तो अमेरिकेतल्या (USA) व्योमिंग (Wyoming) पर्वतातून उगम पावणारा छोटा ऱ्हिदमिक स्प्रिंग (Rhythmic Spring) अर्थात थोड्या थोड्या वेळाने आपोआप चालू-बंद होणारा झरा पाहून. निसर्गाच्या जगभरातल्या काही विशेष आश्चर्यांपैकी हे एक आश्चर्य आहे. ते पाहिल्यावर प्रत्येक जण बुचकळ्यात पडतं. कारण हा झरा दर 15 मिनिटांनी वाहायचा थांबतो आणि पुन्हा 15 मिनिटांनी वाहू लागतो.

व्योमिंग पर्वतरांग खूप मोठी आहे. याच पर्वतरांगेतल्या स्विफ्ट क्रीकमधून (Swif Creek) या छोट्या झऱ्याचं पाणी वाहतं. या झऱ्याची खासियत अशी आहे, की डोंगरांमधून वेगाने पाणी कोसळतं. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने तो प्रवाह थांबतो. सुमारे 15 मिनिटांच्या अंतराने पाणी वाहण्याचं आणि थांबण्याचं चक्र अव्याहतपणे सुरू राहतं. ही खरंच एक अनोखी नैसर्गिक घटना आहे. यामागे काय कारणं असतील, यामागे अनेक तर्क शास्त्रज्ञांनी लावले आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ उटाहचे (University of Utah) प्राध्यापक किप सोलोमन (Pro. Kip Soloman) यांनी या घटनेमागचा कार्यकारण भाव स्पष्ट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, झऱ्याच्या प्रवाहावर सायफन इफेक्ट (Siphon Effect) होतो. त्यामुळे झऱ्याचा प्रवाह थोड्या थोड्या वेळाने बंद होत राहतो आणि पुन्हा सुरूही होतो. प्रत्यक्षात जमिनीच्या आतमध्ये पाण्याचा प्रवाह कायम सुरूच असतो. हा प्रवाह एखाद्या छोट्या ट्यूबमधल्या प्रवाहाप्रमाणे सुरू असतो. जेव्हा पाणी झऱ्याच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी पोहोचतं, तेव्हा सायफन इफेक्ट तयार होतो. आतल्या ट्यूबसारख्या नैसर्गिक रचनेमध्ये हवेचा दाब असल्याने प्रवाह थोडा वेळ बंद होतो. पाण्याची पातळी पुन्हा जेव्हा वाढते, तेव्हा प्रवाहही पुन्हा सुरू होतो.

एका वृक्षतोड करणाऱ्या कर्मचाऱ्याला या झऱ्याचा शोध लागला होता. तो इथे काम करत होता. तेव्हा त्याला पाण्याचा हा अनोखा प्रवाह दिसला. पाणी पिण्यासाठी तो झऱ्यावर गेला होता; मात्र त्याच्या लक्षात आलं, की थोड्या वेळाने पाण्याचा हा प्रवाह थांबतो आहे.

व्योमिंग पर्वतावरचा हा अनोखा झरा हे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. जमिनीखालच्या पाण्याचा प्रवाह कमी असतो, तेव्हा नागरिक इथे येऊन झऱ्याचा आनंद लुटत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *