अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । Sharad Pawar on Ajit Pawar (Marathi News) शिरुरच्या सांगता सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमातून गैरहजर आहेत. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण, दिंडोरी सभेसह रोड शोमध्येही अजितदादा गैरहजर असल्याने विविध चर्चा सुरू आहेत. त्यात अजित पवारांची तब्येत खरचं ठीक नाही असं विधान शरद पवारांनी केले आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना पत्रकारांनी अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझ्या मते ते आजारी आहेत, त्यांची खरच तब्येत ठीक नाही असं पवारांनी अजितदादांच्या तब्येतीवर भाष्य केले. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारात कुठेही दिसत नसल्याने त्यांची अनुपस्थिती प्रखरतेने दिसून येत आहे. अजित पवार शिरूरच्या ११ मे च्या सभेत अखेरचे दिसले होते. मात्र त्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत.

१३ मे रोजीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार गायब झाले. १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरतानाही अजित पवारांच्या जागी प्रफुल पटेल उपस्थित होते. १५ मे रोजीच्या दिंडोरी, कल्याण मोदींच्या सभेतही ते हजर नव्हते. घाटकोपर येथील मोदींच्या रोड शोलाही अजितदादांची उपस्थिती नव्हती. अजित पवार नेमके कुणीकडे आहेत याची माहिती पक्ष कार्यालयाकडेही नसल्याचं समोर आली नाही. मात्र शरद पवारांनी अजित पवार आजारी असल्याचं सांगितले आहे.

बारामतीत यंदा पवारविरुद्ध पवार
गेल्या २ महिन्यापासून राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यात ४ टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता मुंबई, ठाणे, नाशिकसह पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात पवारविरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यामुळे बारामतीत कोण जिंकणार याचीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मात्र ४ जूनच्या निकालात बारामतीचा खासदार कोण हे स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *