![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मार्च २०२६ ।। काळ बदलतो म्हणतात, पण काही व्यवस्था बदलायला हट्टी असतात. मात्र लालपरीने यावेळी हट्ट सोडून हातात डिजिटल काठी घेतली आणि प्रवासाच्या रिंगणात नवा डाव टाकला! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रमाला अवघ्या आठवड्यात एक लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रतिसाद देत डिजिटल युगाला सलाम ठोकला आहे. एकूण १,००,०२१ प्रवाशांनी नोंदणी करत “तिकीट काढा, सुट्टे शोधा” या जुन्या गाण्याला रामराम केला. हा आकडा फक्त संख्या नाही; तो बदलत्या मानसिकतेचा ध्वज आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रतिसाद एसटीच्या डिजिटल परिवर्तनाची ठोस पावती आहे. लालपरी आता फक्त धूळ उडवत धावणारी बस नाही; ती तंत्रज्ञानाच्या रुळांवरून वेगाने झेपावणारी व्यवस्था ठरत आहे.
या नोंदणीत ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांनी आघाडी घेत ३७,९२७ महिलांनी स्मार्ट कार्ड स्वीकारले. घर, संसार, नोकरी आणि प्रवास सांभाळणाऱ्या या महिलांनी डिजिटल पाऊल टाकत बदलाची दिशा दाखवली. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत ३४,९४८ ज्येष्ठांनीही नव्या पर्वाचे स्वागत केले; वयाच्या पल्याड जाऊन त्यांनी “आम्हालाही जमते” हे सिद्ध केले. इतर २४,९२७ ज्येष्ठ नागरिक आणि २,२१९ सर्वसामान्य प्रवाशांनीही सहभाग नोंदवला. रोख व्यवहारांच्या चौकटीतून बाहेर पडत पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाकडे वळण्याची ही सामूहिक तयारी आहे. बसस्थानकातल्या रांगा, सुट्ट्यांचा गोंधळ आणि तिकिटांच्या तक्रारी यांना पर्याय म्हणून हे कार्ड उभे राहत आहे. डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला गती देणारा हा उपक्रम प्रवाशांच्या दैनंदिन जीवनात सोयीची नवी सवय रुजवणार, यात शंका नाही.
दरम्यान, १ मार्चपासून स्मार्ट कार्ड नसल्यास सवलतीचा प्रवास बंद होईल, अशी अफवा समाजमाध्यमांवर रंगली होती. मात्र महामंडळाने स्पष्ट केले आहे की ८० टक्के सवलतधारकांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत सक्ती केली जाणार नाही. त्यामुळे घाईगडबड, भीती किंवा गैरसमज यांना जागा नाही. प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार किंवा अधिकृत एजंटकडे नोंदणी करून या बदलात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्याचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान व्हावा, यासाठी आजची ही नोंदणी म्हणजे भविष्याची आगाऊ तिकिटेच आहेत. लालपरीने डिजिटल कोंदण चढवले आहे; आता प्रवाशांनीही त्या झगमगाटात सहभागी व्हायचे की जुन्या खिडकीतूनच तिकीट घ्यायचे, हा निर्णय त्यांच्या हातात आहे!
