![]()
महाराष्ट्र 24 : पिंपरी, दि. १४ जुलै : इनरव्हील क्लब (IWC) पिंपरी चिंचवडचा ३० वा पदग्रहण समारंभ ॲम्बियन्स हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या विशेष कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. दीपशिखा पाठक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते नूतन अध्यक्षा सौ. वैशाली जैन यांना प्रेसिडेंट कॉलर परिधान करून अध्यक्षपदाची सूत्रे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली.
यावेळी नव्या कार्यकारिणी सदस्य व कमिटी पदाधिकाऱ्यांना बॅच प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये उपाध्यक्ष बेला अग्रवाल, कार्यवाह नीलम मेहता, सहकार्यवाह अपूर्वा गोयल, कोषाध्यक्ष शालिनी चोपडा, आयएसओ अनन्दिता मुखर्जी, सीसी वृन्दा आंबेकर, संपादक स्मिता टिकेकर तसेच सल्लागार समितीमध्ये पास्ट प्रेसिडेंट हंसा मोहन, मनीषा समर्थ आणि विनीता अरोरा यांचा समावेश आहे. तसेच पास्ट प्रेसिडेंट सविता इंगळे यांना आयपीपी (Immediate Past President) बॅच प्रदान करण्यात आला. मॉक इन्स्टॉलेशनसाठी विनीता अरोरा आणि संगीता यांची नियुक्ती करण्यात आली.
पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने क्लबतर्फे विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. दोन गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी १०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. एका गरजू व्यक्तीस सुमारे ५,००० रुपये किमतीची व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. तसेच क्लबच्या निरंतर उपक्रमांतर्गत इस्कॉनला ५,००० रुपयांची देणगी देण्यात आली.
यावेळी क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या १२ सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना क्लबचे ब्रँडिंग असलेल्या आकर्षक पिशवीत रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
याशिवाय गुरुकुल संस्थेसोबत १४,५०० रुपयांच्या नवीन प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी सात फळे (ब्लॅकबोर्ड) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नूतन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली झालेला हा पदग्रहण समारंभ सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि आगामी वर्षातील विविध उपक्रमांची प्रभावी सुरुवात ठरला.