Gold ; सोन्यातील गुंतवणुकीचे पर्याय काय आहेत?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । 1980 च्या दशकात सोने प्रति तोळे साधारण 1000 रुपयांच्या जवळपास होते. आज 60 हजारांवर गेलेला भाव पुन्हा 58 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत (10 ग्रॅम) आला आहे. यात टक्केवारी जर का बघितली की, मागील चाळीस-बेचाळीस वर्षात सोन्याचा भाव हा एक हजारावरुन तब्बल 58,000 झाला तर सरासरी 11% परतावा सोन्याने दिला आहे. इतर गुंतवणुकीच्या माध्यमांसारखे सोन्याचा विचार आपण आपल्या नियोजनात करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो पण त्या आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सध्या तरी जगातला पैसा सोने, डॉलर आणि कच्च्या तेलात फिरत असतो. जेव्हा जगात अस्थिरता असते तेव्हा तो पैसा सोन्यात पार्क केला जातो, म्हणजे सोन्यात गुंतवला जातो किंवा रुपांतरीत केला जातो. यूएस फेडच्या (US Federal Reserve) कालच्या बैठकीत जरी व्याजाचे दर वाढवले नसले तरी सुद्धा आर्थिक संकट अजून काही टळलेले नाही. त्यामुळे डिसेंबर 2022 पासून ते कालपर्यंत जवळपास सोन्याने 10% सुद्धा परतावा दिला आहे. म्हणून पुढे पण असंच असेल का हे सांगता येणे कठीण आहे. पण एक अॅसेट क्लास म्हणून सोन्याकडे आपण नक्कीच बघू शकतो.

आता बघूया सोन्यात गुंतवणुकीचे कोणकोणते प्रकार आहेत. एक म्हणजे सोनाराकडून सोने खरेदी करणे. सोन्याची आभूषणे घेऊ शकतो पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे जवळपास 10% पर्यंत मेकिंग चार्जेस (मजुरी किंवा घडणावळ) द्यावे लागतात. अर्थातच ते तुमच्या गुंतवणुकीमध्ये अॅड होत नाही तर ती एक किंमत आहे जी तुम्हाला चुकवावी लागते. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या 10% तर पहिल्याच दिवशी गेले. त्यापेक्षा अधिक म्हणजे 3% जी एस टी सुद्धा द्यावा लागतो. म्हणजे ही पण एक किंमत आहे जी चुकवावी लागते. सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवायला तिजोरीचा खर्च येईल तो वेगळा. त्यात सोनार ओळखीचा नसेल तर तुमच्या खरेदीत इम्प्युरिटी आणि भेसळ हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो.

मग सोने खरेदीत सोन्याचा बार किंवा बिस्कीट हा पण एक चांगला मार्ग असू शकतो. मेकिंग चार्जही वाचेल आणि त्यापुढे जाऊन ह्यात 99% प्युरिटी राहू शकते. 3% जीएसटी इथे पण द्यावा लागेल. हा खर्च टाळता येण्यासारखा नाही. तिजोरी किंवा सुरक्षेचा खर्च सुद्धा एक महत्वाची किंमत आहे.

डिजिटल सोने तुम्ही घेऊ शकता. पेटीएम किंवा गुगल पे किंवा तनिष्क हे सगळे डिजिटल सोने विकतात. अगदी पाच रुपयांचे सुद्धा सोने खरेदी करता येते. जीएसटी मात्र इथे सुद्धा द्यावाच लागेल. काय वाचेल? तर तिजोरीचा खर्च, मेकिंग चार्जेस आणि इम्प्युरिटीचा धोका. ही गुंतवणुकीच्या खर्चातील मोठी बचत असते. त्यामुळे अगदी पेटीएमने दहा-वीस रुपयांचा चहा घेऊ शकतो तसंच ‘पेटीएम गोल्ड’वर जाऊन तसंच दहा-वीस रुपयांचे सोने ही जीएसटीसकट घेऊ शकतो. दैनंदिन खर्चासोबत चांगली गुंतवणूक आणि बचत ही सोन्याच्या गुंतवणुकीत करता येते.

सोन्याचे ईटीएफ घ्यायचे असेल तर डिमॅट अकाउंट अनिवार्य आहे. सोन्याच्या किंमतीच्या बदलानुसार तुमची व्हॅल्यू निश्चित होईल. याचा खर्च साधारणपणे 0.5 ते 0.6 टक्के असू शकतो. हातात सोने दिसणार नाही. पण तुम्ही सोनं डिजिटल स्वरूपात नक्की खरेदी करू शकता. या व्यवहारात जीएसटी लागणार नाही मात्र पण डिमॅटचा खर्च उचलावा लागेल.

सगळ्या म्युच्युअल फंड्स कडे सोने रिलेटेड फंड्स तुम्ही घेऊ शकता. तुम्ही सोन्याच्या किमतीवर खरेदी नाही करणार, पण NAV वर नक्की खरेदी करू शकतो. NAV च्या किंमती सोन्याच्या किमतीवर आणि त्याच्या देवाण-घेवाणीवर अवलंबून असतात. यासाठी म्युच्युअल फंड दोन टक्क्यांपर्यंत कॉस्ट आकारणी करु शकतात.

एसजीबी (Sovereign Gold Bond)एक अजून एक नवा पर्याय आहे गुंतवणुकीचा. दर तिमाहीला जवळपास ही संधी मिळते यात सुद्धा मेकिंग चार्ज, जीएसटीचा विषय नसतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सरकार इश्यू करते, त्यामुळे सुरक्षेची काहीही काळजी नाही. ज्या प्रकारे सोने वाढेल अथवा कमी हा होईल त्या नुसार ह्याच्या किंमती पण बदलतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एसजीबी (Sovereign Gold Bond)द्वारे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंटची आवश्यकता नसते. त्यामुळे तो खर्च वाचतो. त्याशिवाय यामधील गुंतवणुकीवर सरकार आपल्याला दरवर्षी 2.5% प्रमाणे व्याज देते. म्हणजे सोप्या गणितात सांगायचं तर एसजीबीमध्ये आठ वर्ंच्या मुदतीवर निव्वळ वीस टक्के वाढ काहीही न करता मिळत राहते. शिवाय सोन्याच्या किमतीत वाढ होत राहील त्या प्रमाणात आपल्या गुंतवणुकीचं मूल्यही बदलेल. पण प्रोत्साहन म्हणून मिळणारी अडीच टक्क्याचं व्याजही खूप मोठा फरक ठरु शकते. सोने गुंतवणुकीचा ही एक आकर्षक संधी असू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सोने गुंतवणुकीत किमान आठ वर्षांचा लॉक इन पीरियड असतो.

यात टॅक्स किती लागेल तर, तीन वर्षाच्या आत शॉर्ट टर्म आणि आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे लाँग टर्म. शॉर्टटर्ममध्ये टॅक्स स्लॅबप्रमाणे आणि दीर्घावधीमध्ये 20%. एसजीबी मध्ये आठ वर्षांचे लॉकिंग आहे. पण पाच वर्षांनी गुंतवणूक मोडण्याची संधी मिळते. त्यात सोन्याच्या वाढीवर कुठलाही कर द्यावा लागणार नाही पण जो अडीच टक्के व्याज रुपात दरवर्षी मिळतात, त्यावर टॅक्स स्लॅब प्रमाणे कर द्यावा लागेल.

अश्या प्रकारे आपण आपली गुंतवणूक आपल्या आवडीनुसार आणि गुंतवणुकीच्या जोखमीनुसार करू शकतो. सोन्यात सुद्धा दीर्घावधीसाठी गुंतवणूक महत्वाची असू शकते. इतर खर्च कमी करायचे असेल आणि आपला परतावा वाढवायचा असेल तर एसजीबी हा सर्वोत्तम पर्याय सध्या तरी वाटतो आहे. बघा पटतंय का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *