Digital Detox : डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? जाणून घ्या करण्याची पद्धत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुन ।। Digital Detox : आपले शरीर डिटॉक्स केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्वावे लागते. या गोष्टींमुळेच शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. जसे आपण शरीर डिटॉक्स ठेवण्यासाठी आपल्या आहाराकडे खास लक्ष देतो. अगदी त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डिजिटल डिटॉक्स करणे आवश्यक आहे.

आजकाल सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्क्रिनवर सतत काम केल्याने किंवा मोबाईलचा जास्त वापर केल्याने याचा केवळ डोळ्यांना त्रास होत नाही, तर मानसिक आरोग्यावर ही होतो. त्यामुळे, आपले मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या डिजिटल गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे. हे डिजिटल डिटॉक्स नेमके काय आहे? आणि ते कसे करायचे? चला तर मग जाणून घेऊयात.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?
रात्रंदिवस मोबाईल फोन, लॅपटॉपवर काम करत राहिल्याने याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यात आजकाल विविध प्रकारचे गॅझेट्स, गेमिंग गॅझेट्सचा वाढलेला वापर यामुळे, ताण-तणाव आणि चिंता यांसारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डिजिटल डिटॉक्स करणे फायदेशीर ठरू शकते.

डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी तुम्हाला २ दिवस, १ आठवडा किंवा १ महिना अशा ठराविक कालावधीसाठी फोन, टिव्ही किंवा लॅपटॉपचा वापर न करता तुम्हाला तुमचा दैनंदिन वेळ घालवायचा आहे. तसेच, या कालावधीमध्ये तुम्हाला आभासी जगापासून अंतर राखायचे आहे. यामुळे, तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते.

डिजिटल डिटॉक्स कसे करायचे?
केवळ गरज पडल्यास मोबाईलचा वापर करा
जेव्हा आपण मोकळे बसलेलो असतो तेव्हा, आपण लगेच मोबाईलचा वापर करायला सुरू करतो. जसे की, उगाचच रिल्स किंवा फेसबुकवर स्क्रोल करणे. अशा परिस्थितीमध्ये डिजिटल डिटॉक्ससाठी जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करा. अगदीच तुम्हाला काही महत्वाचा संदेश पाठवायचा असेल किंवा काही तातडीचे काम असेल तरच फोनचा वापर करा.

फोन बंद करा
जर तुम्हाला काही काळ मोबाईलपासून दूर रहायचे असेल परंतु, ही सवय काही केल्या सुटत नसेल तर तुम्ही ठराविक कालावधीसाठी फोन बंद ठेवू शकता. या कालावधीमध्ये तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवू शकता किंव घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवू शकता. यामुळे, तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल आणि तणाव दूर राहील.

नॉन-डिजिटल राहण्याची सवय ठेवा
कोणतेही काम नसताना किंवा मोळका वेळ असताना तुम्हाला लगेच फोन उचलण्याची सवय असेल तर, तुम्ही नॉन-डिजिटल राहण्याची सवय लावणे, अत्यंत आवश्यक आहे.

नॉन-डिजिटल रहायचे म्हणजे काय करायचे तर, तुमच्या छंदांवर लक्ष केंद्रित करायचे. जसे की, मोबाईलऐवजी पुस्तक वाचा, नृत्य करा, कला कौशल्ये किंवा काही वर्कआऊट्स देखील तुम्ही करू शकता. यामुळे, तुमची मोकळ्या वेळेत मोबाईल वापरण्याची सवय हळूहळू कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *