महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुन ।। अंगारकी चर्तुर्थीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर रस्ता मंगळवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय. आज श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
हीच बाब लक्षात घेता पुणे वाहतूक पोलिसांनी शिवाजीनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेता आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त दरवर्षी मध्य पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. यादरम्यान रस्त्यांवर मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
त्याचबरोबर तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मध्य पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी बदल केला आहे. नागरिकांची संभाव्य गर्दी पाहता, शिवाजी रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. पीएमपी बसेस, चारचाकी आणि जड वाहनांना शिवाजी रस्त्यावर मंगळवारी गर्दी संपेपर्यंत बंदी असणार आहे. आवश्यकतेनुसार चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर लाल महाल चौकापासून निर्बंध राहतील.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?
पूरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्त्याने टिळक चौक आणि पुढे नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक-टिळक चौकातून टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बाजीराव रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जावे.