पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, एकनाथ शिंदे अश्विनी-अनिसच्या वडिलांना म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुन ।। देशभरात गाजलेल्या पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात (Pune Porsche Accident Case) मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी सोमवारी (25 जून 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं. तसेच, झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना लवकरात लवकर कठोर शासन केलं जाईल, असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृत तरुण, तरुणीच्या पालकांना दिलं आहे.

देशभरात गाजलेल्या पुणे पोर्शे हिट अँड रन अपघात प्रकरणामुळे पुणे पोलीस आणि प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलानं आपल्या भरधाव कारनं बेदरकारपणे दोघांना चिरडलं होतं. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे झाले होते. अशातच सध्या धनिकपुत्राची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक बड्या हस्तींची नावं समोर आली होती. तसेच, आपल्या लाडक्या बाळाला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या धनिकपुत्राची आई आणि आजोबा अद्याप अटकेत आहेत. तर, वडिलांनी काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला आहे.

अपघात मृत झालेल्या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असताना देखील ही केस नव्यानं उघडून त्यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावं यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आईबापाच्या हाताशी आलेली मुलं अचानक गेल्यानं झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबीयांना पुन्हा सावरता यावं यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही शिंदे यांनी घेतला आहे.

पुण्यात झालेल्या या घटनेनंतर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून कुणालाही पाठीशी घालू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा वेगानं तपास होऊन अनेक जणांना अटक झाल्याचं या दोघांच्या वडिलांनी आणि कुटुंबियांनी मान्य केलं. तसेच, आपल्याला भेटून आपलं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल आणि आपल्या मुलांसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *