दोन दिवसांपासून ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल:राज्यात सर्वाधिक हॉट चंद्रपूर, ब्रह्मपुरीचे तापमान 37.1 वर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर | राज्यातील जनतेला गेल्या दोन दिवसांपासून ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली आहे. रणरणत्या उन्हाळ्यात बसावेत, असे चटके राज्यातील काही उष्ण असलेल्या शहरांतील नागरिकांना रविवारी सहन करावे लागले. वातावरणातील या बदलांमुळे संसर्गजन्य आजारांची साथही पसरली आहे. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर आॅक्टोबरमधील सर्वाधिक ’हीट’ शहर ठरले. या शहराचे कमाल तापमान ३७.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. तर विदर्भातील उष्ण शहर म्हणून आेळख असलेल्या अकोल्याचे कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. ब्रम्हपुरीचे रविवारी नोंदवलेले तापमान राज्यातील सर्वाधिक होते, अशी माहिती नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी दिली.

मान्सूनचा कार्यकाळ संपल्यानंतर हवामानात अनपेक्षित बदल झाला असून, गेल्या आठवड्यापासून साधारणत: १ ऑक्टोबरपासून जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेले आठवडाभर तापमानाचा पारा ३३ ते ३५ अंशांदरम्यान राहीला. मात्र, रविवारी विदर्भातील बहुतांश तसेच राज्यातील काही शहरांनी तापमानाची पस्तीशी आेलांडली. त्यामुळे उकाडयात वाढ झाली आहे. अनेकांना रविवारी मार्च महिन्याप्रमाणे दुपारी उन्हाचे चटके जाणवले.‘ऑक्टोबर हीट’ची अनुभूती आली. रविवारी दुपारी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना विशेषत: महिला, मुले आणि ज्येष्ठांना कडक उन्हापासून बचावासाठी स्कार्फ, आेढणी, रुमाल, टोपीचा आधार घ्यावा लागला.

दरम्यान, कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या तापमानात अधिक थकवा जाणवू नये म्हणून आरोग्याची काळजी घ्यावी आणि वारंवार जास्तीत जास्त पाणी प्यावे, योग्य पोषक आहार, फळांचे सेवन करावे, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे.

ऑक्टोबर हीट म्हणजे काय?
ऑक्टोबरमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात. पावसाळा संपून हिवाळयाला सुरुवात होण्याचा हा काळ असतो. हा बदल होत असताना जो संक्रमणाचा काळ असतो तो ऑक्टोबर महिन्यात येत असतो. या दिवसांत पाऊस थांबलेला असतो अशा वेळी आकाशातून सूर्याची किरणे सरळ धरतीला स्पर्श करत असतात. या किरणांची प्रखरता मार्च महिन्यासारखीच अतितीव्र असते. त्यामुळे मार्च महिन्यासारखा ऑक्टोबर महिन्यात उकाडा असतो. म्हणून त्यास ऑक्टोबर हीट असे म्हणतात, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हवामान अभ्यासक डॉ. अरविंद तुपे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *