NZ vs NED ICC World Cup 2023 : दुखापती केन विल्यमसन अन् साऊथी खेळणार? नेदरलँड संघासमोर किवीचे आव्हान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर | NZ vs NED ICC World Cup 2023 : एकदिवसीय विश्‍वकरंडकात आज न्यूझीलंड-नेदरलँड हे देश आमने-सामने येणार आहेत. गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करताना यंदाच्या विश्‍वकरंडकाची धडाकेबाज सुरुवात केली. आत्मविश्‍वास उंचावलेल्या किवी अर्थातच न्यूझीलंड संघाला आता नेदरलँडशी दोन हात करावयाचे आहेत. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर नेदरलँडचा संघ या स्पर्धेत पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

ज्यो रुटच्या ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने २८२ धावा फटकावल्या होत्या. न्यूझीलंडच्या संघाने ३६.२ षटकांत १ विकेट गमावत २८३ धावा करताना देदीप्यमान विजयाला गवसणी घातली. विल यंग शून्यावर बाद झाल्यानंतर डेव्होन कॉनवे (नाबाद १५२ धावा) व राचिन रवींद्र (नाबाद १२३ धावा) या जोडीने नाबाद २७३ धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली.

न्यूझीलंडने विश्‍वकरंडकाची सुरुवात दमदार केली असली तरी नेदरलँडविरुद्धच्या लढतीतही केन विल्यमसनला खेळता येणार नाही. तो अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड याप्रसंगी म्हणाले, केन विल्यमसन तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला आणखी चपळता दाखवावी लागणार आहे. नेदरलँडविरुद्धच्या लढतीत तो खेळणार नाही, पण न्यूझीलंडचा संघ खेळणार असलेल्या तिसऱ्या लढतीत तो नक्कीच सहभागी होईल.

केन विल्यमसन, टीम साऊथी व लॉकी फर्ग्युसन या प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे सलामीच्या लढतीत ते खेळू शकले नाहीत. विल्यमसन आज होत असलेल्या नेदरलँडविरुद्धच्या लढतीतही खेळणार नाही. मात्र तिसऱ्या लढतीत त्याचे पुनरागमन निश्‍चित आहे. साऊथीही दुखापतीमधून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याच्या सहभागाबाबत अनिश्‍चितता कायम आहे, पण फर्ग्युसन तंदुरुस्त झालेला आहे. मात्र तंदुरुस्त चाचणीनंतर त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *