Swine Flu : राज्यात वाढले स्वाईनचे बळी; एका आठवड्यात ८ बळी, ५० रुग्ण : एच३एन२ चे ३५ रुग्ण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑक्टोबर । राज्यात गेल्या आठवड्यात स्वाईन फ्लू’ने दगावलेल्या रूग्णांची संख्या वाढली असून एका आठवड्यात ही संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या आठवड्यात ५० रूग्ण आढळले असून आठ रूग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. मुंबईतही गेल्या आठवड्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

इन्फल्यूएंझा ए हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. यामध्ये स्वाईन फ्लू एच १ एन१, एच२ एन२, एच३एन२ हे तीन प्रकार आढळतात. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांची संख्या वाढत असते. मात्र यावर्षी स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये वाढ झालेली नव्हती. जूनपासून ते आतापर्यंत स्वाईन फ्लूपेक्षा एच३एन२ च्या रूग्णांची संख्या अधिक आहे. मात्र स्वाईन फ्लूने दगावल्यांची संख्या अधिक आहे. जानेवारीपासून आतापर्यंत एच३एन २ ने ७ रूग्णांचा बळी तर स्वाईन फ्लूने २२ रुग्णांचा बळी घेतला आहे. जानेवारीपासून एकूण १३ लाख ८८, ३४२ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील स्वाईन फ्लू आणि एच३एन२ चे ३,००३ बाधित रुग्ण आहेत. सध्या ६२ रूग्ण रुग्णालयात दाखल आहेत.राज्यात स्वाईन फ्लू रूग्णांची संख्या कमी असूनही दगावल्यांची संख्या अधिक आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत ९ रूग्णांचा बळी गेला होता. सोमवारपासून सात जणांचा बळी गेला आहे.

मुंबईत स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णात दुपटीने वाढ झाली असून या आठवड्यात २० रूग्ण आढळले आहेत.. सप्टेंबर महिन्यात स्वाईन फ्लूचे १८ रुग्ण आढळले होते, मात्र ऑक्टोबर महिन्यात ३० रुग्ण आढळले. बदलत्या हवामानामुळे फ्लू आणि फ्लूसदृश्य रूग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *