विजयादशमीनिमित्त महागाई असतानाही सणासुदीच्या सवलतींमुळे ग्राहकांकडून खरेदीची लयलूट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर | सध्या बाजारपेठेत महागाई असली तरी दसरा-दिवाळीनिमित्त अनेक उत्पादनांवर सूट आणि सवलती देण्यात येत आहेत. याचा फायदा घेत ग्राहकांनी इलेकट्रॉनिक वस्तू, वाहने, घर आणि सोने खरेदीसाठी विजयादशमीचा मुहूर्त साधला. सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असतानाही गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसला. तसेच दसऱ्याचे औचित्य साधून गृहविक्री, नोंदणी, घरांचा ताबा किंवा गृहप्रवेश यातही ग्राहकांचा उत्साह दिसला.

इस्रायलच्या पॅलेस्टाईनवरील हल्ल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड झाल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. असे असतानाही विजयादशमीनिमित्त सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसला. सराफ बाजारात व्यावसायिकांनी घडणावळ किंवा तयार दागिन्यांवर २५ ते ५० टक्क्यांची सूट देऊ केली होती. त्याचीही भूरळ ग्राहकांना पडली आहे. तसेच गुंतवणुकीच्या दृष्टीनेही वळी, नाणी, बिस्किटांच्या स्वरुपात सोने खरेदीकडे कल वाढला असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले. हिऱ्यांच्या दागिन्यांनाही चांगली मागणी राहिली. सायंकाळी सराफ बाजारांमधील गर्दी वाढल्याचे दिसले. आखाती देश युद्धात सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होत चालल्यामुळे सोमवारी रात्रीपासून कच्चे तेल व सोन्याच्या भावात नरमाई दिसून आली. याव्यतिरिक्त इतर अनेक घटक दरवाढीस कारणीभूत असले तरी दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात खरेदीचा उत्साह दिसल्याचे पीएनजी सन्सचे संचालक अमित मोडक यांनी सांगितले.

मालमत्ता बाजारपेठेत उत्साह
सणासुदीच्या काळात घरविक्रीत नेहमीच वाढ होते. याचा अनुभव यंदाही आला. नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून मुंबईतील घरविक्रीत चांगली वाढ झाल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला मोठय़ा संख्येने गृहप्रवेश करण्याकडे ग्राहकांचा कल दिसतो. त्याप्रमाणे मंगळवारीही अनेकांनी घराचा ताबा घेत गृहप्रवेश केले. दुसरीकडे प्रकल्प स्थळांना भेटी देणे, गृहनोंदणी (बुकिंग) करणे अशा व्यवहारांनाही अनेकांनी प्राधान्य दिले. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक विकासकांनी नव्या प्रकल्पांची घोषणा करतात. याला अनुसरून अनेकांनी काही घोषणा, घरविक्रीस सुरुवात किंवा बांधकामाची पायाभरणी केली. दसऱ्याच्या दिवशी नोंदणी वाढावी यासाठी विकासकांनी अनेक सवलतीही देऊ केल्या होत्या. १ ते २३ ऑक्टोबरदरम्यान घरविक्रीची संख्या ७८२८ असून या मुद्रांक शुल्कातून ६१८ कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे.

वाहन खरेदीसाठी झुंबड
मुंबईतील चार आरटीओ विभागातून एकूण ९,५७२ वाहनांची नोंदणी दसऱ्याच्या मूहूर्तावर झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४७५ने वाढ झाली. दसऱ्याच्या आधीपासूनच वाहन खरेदी-नोंदणीचे प्रमाण वाढते. या मुहूर्ताला वाहनाचा ताबा घेण्यासाठी प्रत्यक्षात काही दिवस आधी खरेदी केली जाते. यंदा १६ ते २४ ऑक्टोबरदरम्यान राज्यात ८०,१८६ वाहनांची खरेदी झाली. गेल्यावर्षी दसऱ्यापूर्वी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ७६,१५७ वाहनांची खरेदी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *