कांद्याची @ शंभर ; किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपयांनी विक्री

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर ।। कांद्याची आवक घटल्याने सोमवारी घाऊक बाजारात ५५ ते ६० रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री होत होती. घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढताच मुंबई महानगर पट्टय़ातील ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांमधील किरकोळ बाजारात जास्त दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात कांद्याची ८० ते १०० रुपयांनी विक्री सुरू आहे.

मुंबई तसेच उपनगरांमध्ये पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात कांद्याची आवक होत असते. मार्च महिन्यात बाजारात उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल होतो. या कांद्याचा मोठय़ा प्रमाणात साठा केला जातो. जवळपास सहा ते सात महिने कांद्याचा हा साठा पुरवठय़ाला येत असतो. परंतु,ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांद्याचा साठा काहीसा संपत येतो. तसेच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कांदे खराब होतात. यामुळे त्याची आवक घटते. आताही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात कांद्याची ४० ते ५० रुपये प्रति किलोने विक्री होत होती. तर, किरकोळ बाजारात ७० ते ७५ रुपये प्रति किलोने विक्री केली जात होती. तर, सोमवारी घाऊक बाजारात ५५ ते ६० रुपये तर किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू होती. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या १६६ गाडय़ा दाखल झाल्या आहेत. या गाडय़ांमधून आलेल्या कांद्यामध्ये कमी दर्जाच्या कांद्याचे प्रमाण सर्वाधिक होते. हे कांदे आकाराने लहान आणि काहीसे खराब झालेले होते. तर उत्तम दर्जाच्या कांद्याची आवक कमी प्रमाणात झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन, दर सहा हजार रुपये झाल्यानंतर राखीव साठा बाहेर काढण्याची उत्पादकांची मागणी
किरकोळ बाजारात अवाच्या सव्वा दर

कांद्याची आवक घटल्याने प्रत्येक बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा फायदा किरकोळ बाजारातील कांदे विक्रेते चांगलाच घेताना दिसत आहेत. कांद्याची आवक घटल्याच्या नावाखाली ग्राहकांकडून अवाच्या सव्वा दर आकारले जात आहे. ठाणे शहरातील काही भागात ८० रुपये तर, काही भागात १०० रुपये प्रति किलोने आणि नवी मुंबई शहरात ९० रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *