पुणे रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।। मध्य रेल्वे विभागाकडून तळेगाव-उरुळी या नवीन रेल्वे मार्गासाठी सुरु असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आला आहे. विशेषत: हा रेल्वे मार्ग केवळ मालगाड्यांसाठी बनविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला असून लवकरच मंजुरीसाठी रेल्वे बार्डाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक आता सुरुळीत होणार आहे, असा विश्वास रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

पुणे रेल्वे स्थानकावरून दैनंदीन लांब पल्ल्याच्या ७२ प्रवासी गाड्या धावतात, तर दुसरीकडे दक्षिण भारतात ८० मालगाड्या धावत आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या लोणावळा, पुणे-दौंड या रेल्वे मार्गावरून सर्वाधिक धावतात. मालगाड्याही याच स्थानकावरील मार्गांवरून धावतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावरचा ताण वाढला आहे. विशेषतः अनेकदा नियोजीत प्रवासी रेल्वेच्या वेळापत्रकात अनेकदा बदल करावा लागत आहे.

नियमीत दुसरी गाडी स्थानकावरून जाण्यासाठी इतर गाड्यांना सिग्नल यंत्रणेद्वारे स्थानकापासून काही अंतरावरच (क्राॅसिंग) प्रतिक्षेत थांबावे लागत असून रेल्वे स्थानकातील रेल्वे ‘ट्रॅक’वर जागा उपलब्ध झाल्यावर प्रवासी गाडी स्थानकावर येत असल्याने प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे विभागाने तळेगाव ते उरुळी दरम्यान नवीन ‘ट्रॅक’ तयार करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे विभागाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

रेल्वे विभागाच्या बांधकाम विभागाकडून हा अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी तळेगाव ते उरुळी दरम्यान नवीन मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या मार्गावरून केवळ मालगाड्यांचीच वाहतूक होणार आहे. चाकण- रांजणगाव मार्गे हा मार्ग असून ७० किलोमीटर अंतर असणार आहे. त्यासाठी सात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा अहवाल अंतिम टप्प्यात असून येत्या दोन महिन्यात पूर्ण होऊन परवानगीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रसासनाकडून सांगण्यात आले.

मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी तळेगाव ते उरुळी नवीन मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. संपूर्ण मार्गिकेचा अहवाल तयार होताच मंजुरीसाठी बोर्डाकडे पाठविण्यात येईल. हा मार्ग सुरु झाल्यास प्रवासी रेल्वेचे वेळापत्रक आणखी सुरळीत होईल. पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल. – इंदू दुबे, व्यवस्थापीका, पुणे रेल्वे विभाग

असे होणार फायदे
प्रवासी आणि मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार
प्रवासी गाड्या वेळापत्रकानुसार स्थानकांवर येणार
प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार नाही
नवीन मार्ग चाकण – रांजणगावमधून जाणार असल्याने औद्योगिक विभागाला फायदा
विलंबामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *