![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।। नवीन वर्ष जसजसे जवळ येत आहे तसतसे जगभरात मंदीची चिंता वाढू लागली आहे. जगभर मंदीची भीती अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात असून जगातील काही प्रमुख अर्थव्यवस्था दबावाखाली आल्याने २०२५मध्ये मंदीचा धोका आणखी वाढला आहे. एखाद्या देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सलग दोन तिमाहीत घसरते तेव्हा देशाची अर्थव्यवस्था ‘मंदी’चा बळी पडल्याचे म्हटले जाते. अमेरिका, जर्मनी, जपान आणि न्यूझीलंडसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्था सध्या चांगल्या स्थितीत नाहीत.
नवीन वर्षात मंदीचा धोका कायम
जगात पुन्हा मंदीची लाट येणार आहे का? सध्याची जागतिक परिस्थिती पाहता तज्ज्ञांची चिंता वाढली असून जगातील प्रमुख तज्ज्ञांच्या मते, २०२५ मध्ये जग आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये तणावाची चिन्हे आधीच दिसू लागली असताना भारतातील घसरणारा जीडीपीही असेच काहीसे संकेत देत आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि वित्तीय बाजारातील तणावाची चिन्हे २०२५ मध्ये संभाव्य जोखमीकडे इशारा करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत, आगामी वर्ष आव्हानात्मक असू शकते पण, अमेरिका आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्था मंदीत प्रवेश करतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जगातील मोठ्या अर्थव्यवस्था मंदीच्या सापळ्यात
युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीला सध्या ऊर्जेच्या उच्च किंमती, भू-राजकीय तणाव आणि अमेरिका आणि चीनसोबतच्या संभाव्य व्यापारातील व्यत्यय यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, देशात मंदीची शक्यता बळावली असून ब्रिटनची स्थितीही चांगली नाही. सुधारित जीडीपी आकडेवारीनुसार ब्रिटन तिसऱ्या तिमाहीत शून्य वाढीसह स्थिर स्थितीत असून मंदीच्या वाटेवर अग्रेसर आहे.
त्याचवेळी, जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था जपानही मंदीशी झुंजत असून कमकुवत देशांतर्गत मागणीमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. मंदीमुळे जपानमधील सरासरी घरगुती कर्जाची रक्कम सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त झाली. तसेच या मंदीला न्यूझीलंडही अपवाद ठरू शकला नाही. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाचा जीडीपी १% घसरला असून १९९१ नंतर प्रथमच असं घडलं आणि कोविडनंतर न्यूझीलंडची आर्थिक कामगिरी खूपच कमकुवत झाली आहे.
अमेरिकी अर्थव्यवस्थेवरही काळे ढग
अमेरिकाही आर्थिक मंदीपासून वाचलेली नाही मात्र परिस्थितीत, काही प्रमाणात सुधारणा नक्कीच झाली आहे. गोल्डमन सॅक्सने अलीकडेच, एक लवचिक नोकरी बाजाराचा हवाला देऊन पुढील १२ महिन्यांत यूएस मंदीचा अंदाज २०% च्या आधीच्या अंदाजावरून १५% पर्यंत कमी केला. अमेरिकेतील मंदीची भीती कमी झाली असेल, पण संपलेली नाही.
मंदी टाळता येईल का?
ज्युलियस बेअरचे विश्लेषक भास्कर लक्ष्मीनारायण यांच्या मते, “मंदीची कोणतीही चिन्हे नाहीत. बाजार आणि अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्यास किंमतींमध्ये काही तणाव असू शकतो ज्यामुळे महागाई वाढू शकते.” त्यांनी म्हटले की अमेरिकेत मंदी नव्हे तर महागाई ही सर्वात मोठी चिंता असू शकते. पण मंदी येईलच असे नाही. बँक ज्युलियस बेअरचे मार्क मॅथ्यू म्हणाले की मंदीचा अंदाज बांधणे अशक्य आहे. असे भाकीत करणारे अर्थतज्ञ भाग्यवान आहेत. मात्र उच्च बाजार मूल्यांकन आणि चलनवाढीचा धोका यासारख्या कमकुवतपणामुळे २०२५ विशेषतः नाजूक होऊ शकते अशी चिथावणी त्यांनी दिली.
