मद्यसेवन करून वाहन चालवत आहात ? पोलिसांबरोबर आरटीओ करणार कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।। सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी, वर्दळीच्या रस्त्यांवर तपासणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यासाठी पुणे शहर पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे.

नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ‘पार्टी’ करण्यात येते. मद्यसेवन करून वाहन चालवले जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अपघात, वाहतूककोंडी अशा घटना दर वर्षी होत असल्याने यंदा पाच दिवस तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती आरटीओ अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.

शहरभरात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी वर्दळीच्या चौकांमध्ये, महत्त्वाच्या रस्त्यांवर लोखंडी अडथळे टाकून नाकाबंदी करण्यात येणार आहे. या ठिकाणी ‘आरटीओ’ निरीक्षकांची पथके तैनात करण्यात आली आहेत. वाहनचालकाची अल्कोहोल मूल्यमापन तपासणी यंत्राच्या (ब्रीथ ॲनालायझर) साहाय्याने चाचणी करण्यात येणार आहे. तसेच वाहनाची कागदपत्रे, वाहनचालक परवाना, वाहननोंदणी कागदपत्रे तपासली जाणार आहेत. चाचणीमध्ये मद्यसेवन केल्याचे आढळून आल्यास वाहनचालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे,’ असे भोसले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अल्पवयीन चालकांचीही तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. मद्यसेवन करून वाहन चालवू नये, वाहनांचे कागदपत्र सोबत बाळगावे, नियमांचे पालन करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

दर वर्षी नववर्षाच्या आगमनाच्या काळात पुणे शहरातील बार, मद्यालये, हाॅटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येते. मोकळ्या मैदानांवर, तसेच विशेष ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. यंदाही रात्री उशिरापर्यंत मद्यालये सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यसेवन केल्याने वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर, विशेष ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – स्वप्नील भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *