Weather Update : राज्यात या भागात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता ; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर।। सध्या राज्यात तसेच उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रेदश आणि इतर राज्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे. यादरम्यान भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये १५ ते १७ डिसेंबर, केरळ आणि माहेमध्ये १६ ते १८ डिसेंबर, तर लक्षद्वीपमध्ये १७ आणि १८ डिसेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

केरळमध्ये येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता असून दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *