महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ डिसेंबर ।। Weather News: राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील दक्षिण-पूर्व आणि मध्य पूर्व भागापासून ते आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कार्यरत असून त्याची तीव्रता कायम आहे.
हाच कमी दाबाचा पट्टा आणखी पुढे सरकला आहे. या परिणामामुळे दक्षिण भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागले आहेत. या वार्यांच्या परिणामामुळे उत्तर भारताकडून येणार्या थंड वार्यांवर अटकाव झाला आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन अवकाळी पाऊस पडणार आहे.