AIचा महापूर! नोकऱ्या जाणार नाहीत; उलट वाढणार – अंबानींचा ७ वर्षांचा विराट आराखडा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २० फेब्रुवारी २०२६ |देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) लाट वेगाने उसळत असताना उद्योगविश्वातील सर्वात मोठी घोषणा समोर आली आहे. Mukesh Ambani यांनी AI क्षेत्रात तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. Reliance Industries आणि Jio मिळून पुढील सात वर्षांत हा भव्य आराखडा राबवला जाणार आहे. ‘AI Impact Summit’मध्ये बोलताना अंबानी म्हणाले की, जसं रिलायन्सने मोबाईल डेटाच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या, तसंच AI तंत्रज्ञानही स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. “भारत AIचा ग्राहक नव्हे, तर निर्माता बनेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

AIमुळे नोकऱ्या कमी होतील, अशी भीती जगभर व्यक्त होत असताना अंबानींनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. “AI नोकऱ्या हिरावणार नाही; उलट उच्च-कुशल रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल,” असे ते म्हणाले. त्यांच्या मते, भारताकडे प्रचंड प्रमाणात कुशल अभियंते, डेटा सायंटिस्ट्स आणि तंत्रज्ञ आहेत. या मानवसंपत्तीच्या बळावर भारत AI क्षेत्रात आघाडी घेऊ शकतो. रोजगार क्षेत्रात बदल होईल, पण तो सकारात्मक असेल—अधिक तंत्रज्ञानाधारित, अधिक कौशल्याधारित आणि अधिक उत्पादक, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे AI ही भीती नव्हे, तर संधी आहे, असा संदेश त्यांनी दिला.

या ‘मास्टर प्लॅन’अंतर्गत रिलायन्स भारतीय स्टार्टअप्स, आयआयटी आणि संशोधन संस्थांसोबत भागीदारी करणार आहे. सध्या संगणकीय शक्तीचा प्रचंड खर्च आणि पायाभूत सुविधांची कमतरता ही मोठी अडचण मानली जाते. यावर उपाय म्हणून ‘जिओ इंटेलिजन्स’ नावाने भारतासाठी एक सार्वभौम कॉम्प्युटिंग फ्रेमवर्क उभारले जाणार आहे. जामनगर येथे अत्याधुनिक डेटा सेंटरचे काम सुरू झाले असून, २०२६ अखेरीस १२० मेगावॅट क्षमतेचे केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. पुढे ही क्षमता गिगावॅट पातळीपर्यंत वाढवण्याची योजना आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प हरित ऊर्जेवर आधारित असेल, अशी माहिती देण्यात आली.

मोबाईल क्रांतीनंतर आता AI क्रांती घडवण्याचा निर्धार रिलायन्सने केला आहे. पुढील सात वर्षांत भारतात AIची किंमत कमी, उपलब्धता जास्त आणि रोजगाराच्या संधी व्यापक करण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो, याकडे संपूर्ण उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *