Gold Vs Mutual Funds: गुंतवणूकीसाठी बेस्ट काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ डिसेंबर ।। जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य सुरक्षित करायचं असेल तर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. कारण गुंतवणुकीच्या माध्यमातून तुमची बचत वाढते. पाहूया सोनं आणि म्युच्युअल फंड यातील बेस्ट पर्याय कोणता ठरू शकतो.

जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य सुरक्षित करायचं असेल तर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. कारण गुंतवणुकीच्या माध्यमातून तुमची बचत वाढते. पूर्वीच्या काळी लोक अनेकदा सोनं विकत घेत असत, कारण त्यांच्यासाठी सोन्याचे दागिनेही वापरले जात असत आणि त्यामाध्यमातून ते आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत करत असत.

आजही सोन्याकडे लोकांचा कल कमी नाही. परंतु गुंतवणुकीच्या बाबतीत म्युच्युअल फंडाकडे लोकांचा कल काही काळापासून झपाट्याने वाढला आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडांची गणना गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्यायांमध्ये केली जाते. तुम्हालाही तुमचे पैसे कुठेतरी गुंतवायचे असतील तर आज आपण सोनं आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय हे जाणून घेऊ. यानंतर यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे, हे तुम्ही स्वत:च समजू शकता.

सोन्यात गुंतवणूकीचे फायदे – वर्षानुवर्ष सोनं हा गुंतवणुकीचा विश्वासार्ह पर्याय आहे. ही कमी जोखमीची गुंतवणूक मानली जाते. महागाईबरोबरच सोन्याचे दरही वाढतात. त्याची खरेदी-विक्री सहज करता येते. कठीण काळात तुम्ही सोनं गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता आणि पैशांची गरज भागवू शकता. याशिवाय सोन्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकता.

तर दुसरीकडे आर्थिक अनिश्चितता आणि महागाईच्या काळातही सोन्याचे दर स्थिर आहेत. सोनं कुठेही सहज नेलं जाऊ शकतं. विम्याप्रमाणेच सोनंही संकटाचा साथीदार आहे. सोन्यानं कोरोनामध्ये अनेकांना आधार दिला. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही फिजिकल गोल्ड खरेदी करालच असं नाही, डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफ ही खरेदी करू शकता. डिजिटल सोनं १ रुपयापासून खरेदी करता येतं.

सोन्यातील गुंतवणूकीचे तोटे काय? – काळाच्या ओघात सोन्याचे भाव वाढत राहतात, पण शेअर्स किंवा रिअल इस्टेट सारख्या पर्यायांशी स्पर्धा करता येत नाही. भौतिक सोनं ठेवणं कठीण असू शकते. याशिवाय फिजिकल सोनं जास्त असेल तर ते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला बँकेचं लॉकर किंवा इतर सिक्युरिटी सर्व्हिस भाड्यानं घ्यावी लागू शकते. ज्यासाठी शुल्क भरावं लागतं. फिजिकल सोनं खरेदी करताना मेकिंग चार्जही द्यावा लागतो. मात्र, आजच्या काळात डिजिटल गोल्डचाही पर्याय आहे, ज्यावर मेकिंग चार्ज नाही. सोन्यातून नियमित उत्पन्न घेता येत नाही.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशासाठी? म्युच्युअल फंड ही अशी गुंतवणूक आहे जिथे आपला पैसा शेअर बाजार, रोखे आणि इतर मालमत्तांमध्ये विभागला जातो. शेअर बाजाराच्या चांगल्या कामगिरीवर म्युच्युअल फंड चांगला परतावा देऊ शकतात. यामध्ये तुमचे पैसे अनेक ठिकाणी गुंतवले जातात, ज्यामुळे जोखीम कमी होते. गरज पडल्यास म्युच्युअल फंड तात्काळ रिडीम करता येतात.

यामध्ये तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून कमी रकमेत गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते. म्युच्युअल फंडांमध्ये महागाईवर मात करण्याची क्षमता असल्याचं मागील नोंदींवरून दिसून येतं. दीर्घ काळासाठी त्यातून मोठा पैसा कमावता येऊ शकतो.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे तोटे – ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, त्यात परताव्याची शाश्वती नसते. बाजारात घसरण झाल्यास तोटा होऊ शकतो. चांगल्या परताव्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यासाठी संयम बाळगणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंडांना मॅनेजमेंट फी असते. म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार आहेत. सहसा त्यात केलेली गुंतवणूक कराच्या कक्षेत येते. मात्र, ईएलएसएस योजना तुम्हाला टॅक्स बेनिफिट देते.

कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य? – सोनं आणि म्युच्युअल फंड या दोन्हींचे स्वतःचे फायदे-तोटे आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपली आर्थिक उद्दिष्टे, कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता यांचे मूल्यमापन करा. जर तुम्हाला कमी जोखीम हवी असेल आणि महागाईपासून बचाव करायचा असेल तर सोनं हा चांगला पर्याय आहे. पण जर तुम्ही जास्त परताव्यासाठी दीर्घ काळ गुंतवणूक करू शकता आणि थोडी जोखीमही घेऊ शकत असाल तर म्युच्युअल फंड चांगले असतात. विविधतेसाठी दोन्हीमध्ये गुंतवणूक करा.

टीप – यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *