South Africa vs India, 2nd Test : टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या दीड दिवसात धुव्वा; मालिका 1-1 बरोबरीत सोडवली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जानेवारी ।। टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या दीड दिवसात धुव्वा उडवत मालिका 1-1 बरोबरीत सोडवली आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान राहिले.

सिराजने पहिल्या डावात 6 बळी घेतले, तर बुमराहने दुसऱ्या डावात 6 फलंदाजांना माघारी धाडले. पहिल्या डावात 98 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुसऱ्या डावात 176 धावा करता आल्या. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले, जे टीम इंडियाने तीन गडी गमावून सहज गाठले.


दुसऱ्याच दिवशी भारताने दुसरी कसोटी जिंकली. यासह दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ 55 धावा करू शकला. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात 153 धावा केल्या आणि 98 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात अ‍ॅडम मार्करमच्या शतकाच्या जोरावर यजमान संघाने 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसरी कसोटी तीन विकेट्स गमावून जिंकली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या डावात 153 धावांत गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्याच दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. दिवसअखेर आफ्रिकेने 3 बाद 62 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसअखेर आफ्रिका 36 धावांनी पिछाडीवर होती.त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कहर केला, 6 विकेट्स घेत आफ्रिकेला 176 धावांत सर्वबाद करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. बुमराहशिवाय मुकेश कुमारने 2 आणि सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 1 बळी घेतला. दुसऱ्या डावात आफ्रिकेकडून एडन मार्करमने शतक झळकावले आणि 103 चेंडूत 17 चौकार आणि 2 षटकारांसह 106 धावा केल्या, परंतु इतर कोणत्याही फलंदाजाने मार्करमला साथ दिली नाही.

भारताने हे लक्ष्य सहज गाठले
दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ 176 धावांत सर्वबाद झाला आणि भारताला 79 धावांचे लक्ष्य दिले, जे रोहित ब्रिगेडने 12 षटकांत गाठले आणि दुसरा दिवस संपण्यापूर्वीच जिंकला. चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने भारताकडून 28 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.

भारताकडून वेगवान गोलंदाजांनी 20 बळी घेतले
या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी करत सर्व 20 विकेट घेतल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 6 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी 2-2 विकेट घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. याशिवाय मुकेश कुमारला 2 यश मिळाले. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी 1 बळी घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *