W,0,W,0,W,0 ; पाकिस्तानची बेक्कार अवस्था, ९ धावांत पडल्या ५ विकेट्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जानेवारी ।। भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली कसोटी दोन दिवसांत संपल्यानंतर आता सिडनी येथे सुरु असलेल्या पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटीत रोमांचक वळण आलेले पाहायला मिळतेय. दोन कसोटींत दारूण पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी मिळवली. पण, जोश हेझलवूडच्या एका षटकाने पाकिस्तानची अवस्था बिकट केली आहे. हेझलवूडने W,0,W,0,W,0 असे षटक फेकले आणि पाकिस्तानचे ५ फलंदाज ९ धावांत माघारी परतले.


पाकिस्तानने पहिल्या डावात ३१३ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरुवातीनंतरही २९९ धावांवर समाधानी रहावे लागले. डेव्हिड वॉर्नर ( ३४) व उस्मान ख्वाजा ( ४७) यांनी चांगली सुरुवात करून दिली. मार्नस लाबुशेन ( ६०), स्टीव्ह स्मिथ ( ३८), मिचेल मार्श ( ५४) व अॅलक्स केरी ( ३८) यांनी चांगला खेळ केला होता. पण ५ बाद २८९ वरून त्यांचा संपूर्ण संघ २९९ धावांत तंबूत परतला. पाकिस्तानच्या आमीर जमालने ६९ धावांत ६ विकेट्स घेऊन कमाल केली. १४ धावांची आघाडी घेऊन पुन्हा मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानची दुसऱ्या डावात वाईट अवस्था केली.

मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात सलामीवीर अब्दुल्लाह शफिकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर जोश हेझलवूडने दुसऱ्या षटकात शान मसूदला भोपळ्यावर माघारी पाठवले. सईम अयुब व बाबर आजम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु नॅथन लियॉन आडवा आला. अयुब ३३ धावांवर पायचीत झाला. ट्रॅव्हिस हेडने आणखी एक धक्का देताना बाबरला ( २३) बाद केले. त्यानंतर जोश हेझलवूडने एका षटकात ३ धक्के देत पाकिस्तानची अवस्था ७ बाद ६८ अशी दयनीय केली. २ बाद ५८ नंतर त्यांचे ५ फलंदाज अवघ्या ९ धावांचे योगदान देऊन माघारी पाठवण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश आले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानकडे ८२ धावांची आघाडी आहे. पहिल्या डावातील नायक मोहम्मद रिझवान व आमेर जमाल हे खेळपट्टीवर आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *