शरद मोहोळ खून प्रकरण : कुख्यात गुंड गणेश मारणेसह तिघांना अटक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. 1 फेब्रुवारी ।। गुंड शरद मोहोळ याला त्याच्या घराजवळ गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून करण्याच्या कटातील मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड गणेश निवृत्ती मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक रोड येथून पाठलाग करून पकडले. गणेश निवृत्ती मारणे, संतोष पासलकर, राहुल शिंदे अशी पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

याप्रकरणी गुन्हे शाखेने साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, 16 जणांवर नुकतीच मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुंड शरद मोहोळचा 5 जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. या वेळी खून करून पळून जात असताना या तिघांनी ’आम्ही तर गणेश मारणे टोळीतील पोरं’ असा आवाज देऊन घटनास्थळावरून धूम ठोकली होती. खुनाच्या या गुन्ह्याला विविध कंगोरे असून, नेमका खून कोणत्या कारणासाठी केला? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

गुन्हा घडल्यापासून गणेश मारणे हा पोलिसांना चकवा देत होता. तेव्हापासून गुन्हे शाखेच्या पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. बुधवारी तो नाशिक रोड परिसरातून त्याचे साथीदार संतोष पासलकर आणि राहुल शिंदे यांच्यासोबत जात असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अजय वाघमारे आणि त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांना मिळाली होती. नाशिक रोडवरून ते भोरच्या दिशेला जाणार असल्याची माहिती मिळताच पुण्यातून एक टीम नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात आली असता पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, उपनिरीक्षक मोहनदास जाधव व अंमलदारांची टीम रवाना करण्यात आली असता दोन्ही टीमने पाठलाग करून पकडले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके गणेश मारणेच्या अटकेसाठी रवाना करण्यात आली होती.

असे आहे गणेश मारणेचे रेकॉर्ड….
– डेक्कन पोलिस ठाणे – भादंवि कलम 307, 34 (निर्दोष)
– फरासखाना पोलिस ठाणे – भादंवि कलम 324, 504, 34 (निर्दोष)
– कोथरूड पोलिस ठाणे भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149 (कोर्ट पेंडिंग)
– डेक्कन पोलिस ठाणे – भादंवि कलम 307 (निर्दोष)
– बंडगार्ड पोलिस ठाणे – आर्म अ‍ॅक्ट 4 (25)
– शिवाजीनगर पोलिस ठाणे – भादंवि कलम 353, 225 (ब), 228, 323, 504, 34 (निर्दोष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *