MNS Exit Poll : राज ठाकरेंची फौज विधानसभेत? मनसेला इतक्या जागा मिळण्याचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ नोव्हेंबर ।। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यावर बुधवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी (एग्झिट पोल) राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ महायुती (भाजप + राष्ट्रवादी काँग्रेस + शिवसेना) सत्तेत पुनरागमन करेल, असा अंदाज वर्तवला आहे.

कोणाला किती जागा?
‘पोल ऑफ पोल्स’नुसार, महायुतीला १५० ते १५८, महाविकास आघाडीला १२१-१३१ आणि इतरांना ९ ते १२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. हे अंदाज कितपत खरे ठरतात हे शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी निकालादिवशी स्पष्ट होईल. त्या दिवशी दोन्ही राज्यांचे आणि अन्य पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

मनसेचं काय होणार?
दरम्यान, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरलेली आहे. लोकसभेला भाजपला पाठिंबा देणारी मनसे यावेळी स्वबळावर उतरली आहे. त्यामुळे मनसेला किती जागा मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. विशेष म्हणजे राज यांचे सुपुत्र अमित ठाकरेही रिंगणात असल्याने सर्वांचे डोळे लागले आहेत.

इतरांमध्ये समावेश
मनसेने राज्यभरात १२८ जागांवर उमेदवार उभे केले होते. मनसेच्या पाठिंब्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. विविध संस्थांनी केलेल्या एग्झिट पोलमध्ये मनसेला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नाही. इतर या श्रेणीत मनसेसह वंचित, एमआयएम, सपा, अपक्षांचाही समावेश आहे.

चार जागांचा अंदाज
दैनिक भास्करच्या एग्झिट पोलमध्ये मनसेला दोन ते चार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मनसेच्या प्रमुख उमेदवारांमध्ये अमित ठाकरे, विद्यमान आमदार राजू पाटील, तसेच बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसे किंग ठरणार की किंगमेकर, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

दरम्यान, इलेक्ट्रोरल रेज व एसएएस या दोन संस्थांच्या एग्झिट पोलनुसार, राज्यात महायुतीच्या हातून सत्ता जाणार व महाविकास आघाडी सत्तेवर येणार, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. इलेक्ट्रोरल रेजच्या अंदाजानुसार, महाविकास आघाडी किमान १५० जागांसह सत्तेत येईल व महायुतीला ११८ जागांवर समाधान मानावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *