पिंपरी चिंचवड : मालमत्ता करातून महापालिका मालामाल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मार्च ।। महापालिका तिजोरीत मालमत्ता करातून ९१० कोटी रुपये जमा झाले आहेत. एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत ९० कोटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत कर संकलन कार्यालये खुली राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी १७ विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत ९१० कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळजोड खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. आज (२९ मार्च) शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार, रविवार महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन कार्यालये सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कराचा भरणा करता येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

ऑनलाइन कर भरणा वाढला
आत्तापर्यंत औद्योगिक चार हजार ३९५, निवासी चार लाख २६ हजार ५३०, बिगरनिवासी ४४ हजार ५५४, मिश्र १२ हजार ४३२, मोकळ्या जमिनी ४ हजार ४१६ अशा चार लाख ९२ हजार ४२२ जणांनी कराचा भरणा केला आहे. ऑनलाइन ५१३ कोटी ५८ लाख, रोखीत १३१ कोटी २४ लाख, धनादेशाद्वारे १४७ कोटी १७ लाख, इडीसी १२ कोटी ९३ लाख, आरटीजीएस ४३ कोटी २० लाख, धनाकर्ष (डिमांड ड्रॅाफ्ट) आठ कोटी १२ लाख, विविध उपयोजन सहा कोटी ९३ लाख आणि इनइफ्टीद्वारे सहा कोटी ८३ लाख रुपये जमा झाले आहेत.

वाकड विभागात सर्वाधिक कर भरणाऱ्यांची संख्या
शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे १७ विभागीय कार्यालये आहेत. यामध्ये वाकड विभागात सर्वाधिक म्हणजे ६५ हजार मालमत्ताधारकांनी १४८ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल सांगवी, चिखली, चिंचवड, मोशी, भोसरी विभागात कराचा भरणा झाला आहे. तर, सर्वांत कमी तळवडे विभागात आठ हजार ९६ मालमत्ताधारकांनी २३ कोटी ३८ लाखांचा कर भरणा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *