पारंपरिक युतीतला तिसरा मतदारसंघ शिंदेंनी गमावला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ एप्रिल ।। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केलेला दावा फेटाळून लावत भाजपने गुरुवारी बहुचर्चित रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेल्याने आता शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे आणि पालघर हे दोन मतदारसंघ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, औरंगाबाद व नाशिकसह भाजप आणि शिंदे गटात ज्या जागांवर तिढा निर्माण झाला आहे तो येत्या आठवडाभरात सोडवून, उर्वरित सातही मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार जाहीर होतील, असे दिल्लीतील भाजप सूत्रांनी सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडे गेल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिंदे गटातील उमेदवारीचे दावेदार किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली आहे. राणे यांची उमेदवारी जाहीर होत असताना उदय सामंत यांना, केवळ महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगावे लागले.

महायुतीच्या जागावाटपात ठाणे, नाशिकप्रमाणे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेचाही तिढा होता. रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ नेमका कुणाच्या वाट्याला जाणार आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार याविषयी संपूर्ण कोकणात उत्सुकता होती.

शिवसेनेतील फुटीचा राजकीय फायदा
शिवसेनेतील फुटीचा राजकीय फायदा उठवत भाजपने अमरावतीपाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघही आपल्याकडे घेतला आहे. यापूर्वी एकत्रित शिवसेना असताना हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडून लढवले जात होते. मात्र, यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदानयंत्रावर भाजपचे कमळ चिन्ह झळकणार आहे. यापूर्वी एकत्रित शिवसेना लढवत असलेला धाराशिवचा मतदारसंघ भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *