वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी होणार देहूरोड ते बालेवाडी उड्डाणपूल – खासदार बारणे*

Spread the love

महाराष्ट्र 24- दि. 19 एप्रिल – देहूरोड, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर देहूरोड ते बालेवाडी असा तब्बल साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) सकाळच्या सत्रात पुनावळे भागातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. माजी नगरसेवक चेतन हुशार भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलताना बारणे यांनी वरील माहिती दिली. त्यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ‌ तसेच हुशार भुजबळ, हिरामण भुजबळ, संतोष दर्शले, शरद दर्शले, अतुल ढवळे, हेमंत कोयते, राजेश दर्शले, शंकर नाना गायकवाड, अतुल काटे, दीपक मोढवे पाटील, रेश्मा भुजबळ आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. या भागातील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर देहूरोड ते बालेवाडी असा साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. त्यासाठी 6,600 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी स्थानिक शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यानंतर या उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकेल. थेट जाणारी वाहतूक उड्डाण पुलावरून गेल्यामुळे स्थानिक वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल.

निगडी ते वाकड या नियोजित मेट्रो मार्गावर पुनावळे हे स्टेशन असणार आहे. त्यामुळे या भागातील विकासाला अधिक गती मिळेल, असे बारणे यांनी सांगितले. शहराची 2040 पर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही बारणे यांनी यावेळी दिली. पुनावळे कचरा डेपो रद्द करण्याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला होता, याकडेही बारणे यांनी लक्ष वेधले.

आमदार अश्विनी जगताप यांनी बारणे यांना शुभेच्छा दिल्या. उमेदवाराचे चिन्ह हे श्रीरामाचे धनुष्यबाण आहे. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला हा बाण आहे. त्यामुळे बारणे यांचा विक्रमी विजय निश्चित आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार बारणे यांचे नेहमी सहकार्य मिळते, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आत्ता आम्ही बारणे यांचा प्रचार करीत असलो तरी तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे. तेव्हा तेही आम्हाला मदत करतील, असे आमदार जगताप म्हणाल्या.

*श्री काळभैरवनाथ व श्रीरामाचे दर्शन*

पुनावळे येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर तसेच श्रीराम मंदिरात जाऊन खासदार बारणे व आमदार जगताप यांनी दर्शन घेतले. त्यानंतर शेखर ओव्हाळ, संतोष दर्शले, रेखा दर्शले, कुंदा दर्शले, रवींद्र साहेबराव ताजणे, रामदास काटे, आतिश काटे, पांडुरंग काटे, राजाराम काटे, शुभम काटे, सचिन काटे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली.

रावेत येथे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या ‌निवासस्थानी देखील त्यांनी भेट दिली. त्यावेळी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे उपस्थित होते. सर्व ठिकाणी औक्षण करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *