कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। मांजरी – शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्य जनतेच्या जनजीवनातील सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का? मांजरी येथील जेतवन बुद्ध विहार ट्रस्टला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली यावेळी डॉ. कोल्हे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं, परवा कोणीतरी म्हणलं की पाहिजे तेवढा निधी देतो, पण कचाकच बटन दाबा. पण ही लोकशाही मूल्यांची अवहेलना होत आहे. हा निधी आपल्याच पैशातून दिला जातो. असं म्हणत अजित पवार यांच्या विधानावर डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान आढळराव पाटील यांनी देखील आपल्या खेडच्या प्रचार दौऱ्यात उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करत त्यांनी शेवटची निवडणूक म्हणून जाहीर केलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्या आधीच त्यांनी सांगून टाकलं की, त्यांची ही शेवटची निवडणूक. समोर पराभव दिसत असल्याने सहानुभूती मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. कोल्हे यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर १५ वर्षाच्या संसदीय कामगिरीच्या जोरावर निवडणूकला सामोरे जायला हवं होतं. परंतु तसं काहीच पाहायला मिळत नाही. केवळ वयक्तिक टीका आणि सहानुभूती या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जातोय. याशिवाय मतदारसंघात १५ वर्षांत काहीही काम केलं नाही, कोणताही मोठा प्रकल्प आणता आला नाही. त्यामुळे माजी खासदार सपशेल फेल ठरलेले असताना असा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

सर्वसामान्य मतदार सुज्ञ झाला आहे, जर कोणी म्हणलं की ही माझी शेवटीची निवडणूक आहे, याचा अर्थ पुन्हा २०२९ ला मत मागायला येणार नसाल तर मतदारांशी बांधीलकी कशी ठेवणार ? असा प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले आढळराव पाटील यांना डॉ. अमोल कोल्हे सवाल केला. ही कोणाची व्यक्तिगत निवडणूक नाही. ही कोणाची पहिली निवडणूक की, कोणाची दुसरी निवडणूक याचा मतदारांना काहीही घेणं देणं नाही. ही देशाची निवडणूक आहे, पुढील पाच वर्षे हा देश कोणाच्या हातात द्यायचा ही त्याची निवडणूक आहे.

दैनिक भास्कर या फार मोठ्या वृत्तपत्रातच्या सर्वेत ३९ जागा महाविकास आघाडीला दाखवल्या आहेत. महागाई वाढली आहे, कोणाला नोकऱ्या नाही सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का.? त्यामुळे आपल्याला देशात इंडिया आघाडीचे सरकार देशात निवडून देण्याची गरज असल्याच्या भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी मांजरी येथे बोलताना व्यक्त केल्या.

यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार महादेव अण्णा बाबर, प्रशांत जगताप, प्रवीण तुपे, विक्रम शेवाळे, राहुल घुले, निलेश मगर, सागर बताले, मोनिष गायकवाड, सुनील गोरे, निलमताई गायकवाड, रोहिदास लांडगे, श्री कांबळे, सोपान लगड, मेहुल कापसे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *