Summer Care: उन्हाच्या तडाख्यात वाळ्याचे पाणी आरोग्यपूर्ण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। उन्हाळ्यात माठात वाळा टाकून पाणी नियमितपणे पिणे आरोग्यपूर्ण आहे. यामुळे पाण्यास छान वास येतो. महत्त्वाचे म्हणजे असे पाणी पिल्यावर मन प्रफुल्लित होते. उन्हाळ्यात शीतपेय व फ्रीजमधील पाणी पिण्यापेक्षा वाळा वनस्पतीचे उशिरासव अधिक आरोग्यपूर्ण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात काही जणांना घणा फुटून वारंवार नाकातून रक्त पडते. अशा प्रकृतीच्या लोकांना उशीरासव फार चांगल्या प्रकारे उपयोगी पडते.

वाळा म्हणजे काय ?
वाळा गवतासारखा असतो. त्याच्या मुळ्यांस वास येतो. याचे गड्डे असतात. ते लावल्यापासून एक ते दोन वर्षांत खूप बेटे होऊन त्याच्या मुळ्या सर्वत्र पसरतात. त्या मुळ्या दोन वर्षांनंतर चिखल व माती यांचा अंश न राहील अशा पद्धतीने साफ करून धुवून वाळवितात. हे गड्डे बहुधा पाटाच्याबाजूस लावतात. वाळा सुवासिक थंड व दाह शामक आहे. वाळ्याचे पडदे, पंखेही करतात. वाळ्याचे पांढरा वाळा, काळा वाळा, पिवळा वाळा असे प्रकार आहेत.

ठळक बाबी

उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे आरोग्यास हिताचे

या पाण्यात वाळा टाकणे अधिक फायदेशीर आहे

माठातील वाळा गड्डी तीन चार दिवसांनी बदलावी

काढलेली वाळा गड्डी वाळवून पावडर करून ठेवा

वाळ्यापासून उशिरासव असे करा !

प्रमाण- एक तोळा 12 ग्रॅम काळा वाळा, पिवळा वाळा, पांढरे कमळ, शिवणीची मूळे, निळे कमळ, गव्हला, पद्मकाष्ठ, लोध्र, मंजिष्ठा, धमासा, पहाडमूळ, काडेचिराईत, वडाची साल, उंबराची साल, कचोरा, पित्तपापडा, पुंडरीक कमळ, कडू पडवळ, कांचनाची साल, जांभळाची साल, मोचरस (शाल्मली काटेसावर) ही प्रत्येकी चार चार तोळे घेऊन त्यांचे चूर्ण करावे. काळ्या मनुका 80 तोळे, धायटीचें फूल 64 तोळे घेऊन, 2048 तोळे पाण्यात ही सर्व औषधे मिश्र करावीत. त्यात साखर 400 तोळे व मध 200 तोळे घालून सर्वांचे चांगले मिश्रण करावे. नंतर ते मिश्रण मडक्यात घालून आसव बनवावे. याला उशिरासव असे म्हणतात.

वाळा पित्त व कफनाशक तसेच दुर्गंधीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड करून प्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *