देशात हवामानाची ‘गुगली’..! काही राज्‍यांत पाऊस तर मैदानी राज्‍यात पारा @42

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ एप्रिल ।। विविध राज्‍यांमध्‍ये हवामान बदलामुळे निसर्गाचे वेगवेगळे रुप पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशसह १३ राज्यांमध्ये पारा 40 ते 46 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तर काही राज्‍यातील पर्वत रांगामध्‍ये हिमवृष्‍टीसह पावसानेही हजेरी लावली आहे. पाच राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. पुढील पाच दिवस वातावरण जैसे थे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड आणि झारखंडमधील गंगा किनारी भागात उष्णतेची लाट सुरू आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात अनेक ठिकाणी मागील २४ तासांमध्‍ये तापमान ४२ ते ४६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले आहे.

केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसाठी अति उष्मा आणि आर्द्रतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. ओडिशामध्ये सोमवारपर्यंत उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट कायम आहे. राज्यातील शाळांना २५ एप्रिलपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर-पश्चिम भारताबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आहे. १४ राज्यांच्या विविध भागात पाऊस, वादळ आणि गारपीट होत आहे.

मैदानी राज्‍यांना उष्‍णतेचा तडाख्‍यात
एकीकडे मैदानी भाग कडाक्याच्या उष्णतेच्या तडाख्यात आहेत, तर दुसरीकडे हिमाचलमध्ये एप्रिलमध्येही बर्फवृष्टी थांबत नाहीय. हवामान केंद्राने राज्यात २२ ते २३ एप्रिल दरम्यान पाऊस आणि हिमवृष्टीचा यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी रोहतांग पास आणि कोकसरमध्ये बर्फवृष्टी झाली. कुल्लू, चंबा आणि धरमशाला येथे मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. पंजाब, हरियाणा आणि पहाडी राज्ये-हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, लडाखच्या मैदानी भागात कमाल तापमान 30-35 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

पूर्व भारतात पारा ४४ अंशांवर पोहोचेल
IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी सांगितले की, पुढील चार-पाच दिवसांत पूर्व भारतातील कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. पुढील दोन-तीन दिवस दिल्लीतील तापमान ३८ अंशांच्या आसपास राहील. यानंतर, एक किंवा दोन अंशांची वाढ होऊ शकते. सोमवारी राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. बंगालमध्ये कमाल तापमान 6.5 अंशांनी सामान्य आणि किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त आहे, या पार्श्वभूमीवर तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ राज्‍यांमध्‍ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
दक्षिण केरळ, आग्नेय तेलंगणा, पूर्व मेघालय आणि लगतच्या आग्नेय आसाम आणि मणिपूरमध्ये तीव्र ते अतिशय तीव्र प्रवाहामुळे पुढील काही तासांत या प्रदेशात गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *